पुणे (Pune) : इंधनाचे वाढलेले दर (Petrol), पर्यावरणाबाबत निर्माण झालेली जागरूकता आणि वाहनाच्या वापरात होणाऱ्या खर्चाची होत असलेली बचत यामुळे सध्या इलेक्ट्रिक वाहनाला (EV) मिळणारी पसंती वाढली आहे. त्यामुळेच ‘ईव्ही’ मोटार खरेदीची इच्छा असलेल्यांच्या संख्येत पाचपट वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर ‘सीएनजी’ (CNG) वाहनांची चौकशी देखील वाढली आहे. मोटार खरेदीदारांनी ‘ईव्ही’ला चांगला प्रतिसाद दिल्याने ‘एसयूव्ही’च्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
२०२३ मध्ये ‘कार्स २४’ या प्लॅटफॉर्मवर ‘ईव्ही’च्या विक्रीत पाचपट वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यायी इंधन तसेच किफायतशीर व पर्यावरणपूरक प्रवासाकडे वाहनचालकांचा कल आहे. ‘ईव्ही’बद्दल उत्सुक असणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत असून दररोज सरासरी २०० चौकशींची नोंद होत आहे, असे ‘कार्स २४’च्या अहवालात नमूद आहे.
कोणत्याही कार खरेदीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ग्राहक अंदाजे तीन तास त्या कारबाबत ऑनलाइन माहिती घेत आहे. वाहन खरेदीच्या या बदलाचे वेगळेपण म्हणजे खरेदीदारांनी आपली गाडी दहा-बारा वर्षांनी बदलण्याऐवजी आता पाच ते सहा वर्षांत बदलत आहेत. जुनी गाडी विकून नवी आणि अधिक चांगली व अद्ययावत गाडी घेण्यावर भर आहे.
जुन्या मोटारीसाठी सहज कर्ज
आवडती कार घेण्यासाठी वाहन कर्ज घेण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. अहमदाबाद, हैदराबाद, कोईंबतूर आणि राजकोट अशा शहरांमध्ये लक्षणीय बदल दिसून आला आहे. दिल्ली हे वापरलेल्या कारसाठी सर्वाधिक कर्ज घेणारे शहर ठरले आहे. देशातील इतर शहरात देखील वाहन कर्जाचा आलेख वर जाणार आहे.
कंपनी फिटेड सीएनसी मोटारीला पसंती
कंपनी फिटेड सीएनसी मोटारीची मागणीही गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच २.६ पटींनी वाढली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक सीएनजी मोटारीला प्राधान्य देत आहेत. गेल्या वर्षी ‘एसयूव्ही’च्या विक्रीत होत असलेली वाढ कायम राहिली आहे. गाडीचा लूक, प्रशस्त जागा, ऑफ-रोड प्रवास आणि सुरक्षितता यावेळी ही खरेदी होत आहे.
अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
- कारविक्रीसाठी ग्राहकांची सर्वांत जास्त पसंती शनिवारला
- जुलै महिना खरेदीसाठी सर्वांत लोकप्रिय
- दरवर्षी सुमारे ५०२ कोटी रुपये किमतीच्या जुन्या मोटार बाजारपेठेत
- विक्री झालेल्या प्रत्येक दहा मोटारीमध्ये १५ वापरलेल्या मोटार बाजारपेठेत येत आहेत
- स्त्रियांनी घेतलेल्या वाहन कर्जाच्या संख्येत ११५ टक्के वाढ