E Cart (Railway) Tendernama
पुणे

Pune: पुणे रेल्वे स्थानकावर मिळणार 'ही' सुविधा; वेळ, पैसेही वाचणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाणे आणि रिक्षा, कॅबपर्यंत पोचणे सोपे होणार आहे. कारण, रेल्वे प्रशासन दोन बॅटरी ऑपरेटेड कार्ट सुरू करणार आहे. त्यासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ही सेवा सुरू होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे दीड लाख आहे. स्थानकावर लिफ्ट नसल्याने एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी अनेकांना कुलीची मदत घ्यावी लागत होती. यासाठी त्यांना ६०० ते ७०० रुपये मोजावे लागत होते.

आता रेल्वे प्रशासनाने रॅम्प सुरू केला आहे. तसेच व्हीलचेयरची सुविधाही केली आहे. तरी देखील दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारे घेऊन जाणे त्रासदायक ठरत होते. बॅटरी कार्ट आल्याने प्रवाशांना बॅगही घेऊन जाता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने यासाठी काढलेल्या टेंडर प्रक्रियेला चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

फलाट एकवर बॉडी मसाज खुर्ची

पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना ताणतणावातून मुक्तता मिळण्यासाठी बॉडी मसाज खुर्चीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी रेल्वेने टेंडर प्रक्रिया राबविली आहे. पुणे स्थानकाच्या सोलापूरच्या दिशेने असलेल्या प्रतिक्षालयाजवळ दोन बॉडी मसाज खुर्च्या बसविणार आहेत. पैसे देऊन प्रवासी या सेवेचा फायदा घेऊ शकतात.

पुणे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी बॅटरी कार्ट व मसाज खुर्चीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. बॅटरी कार्टमुळे आजारी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा स्थानकावरील वावर सोपा होईल. त्यामुळे त्यांचा वेळही वाचेल.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे