Water Tunnel Tendernama
पुणे

PUNE: 25 किमीच्या 'या' बोगद्याच्या कामाला लवकरच मुहूर्त?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहराच्या (Pune City) पाणी सुधारणा, शेतीला देखील पुरेसा पाणी पुरवठा करण्याबरोबरच विविध प्रकारे होणारी गळती रोखण्यासाठी खडकवासला ते फुरसुंगी (Khadakwasla - Fursungi Tunnel) दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या योजनेचा प्रारूप प्रकल्प अहवाल सल्लागार (ड्राफ्ट DPR) कंपनीकडून जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालाची छाननीचे काम जलसंपदा विभागाकडून सुरू करण्यात आले आले असून, लवकरच तो अंतिम मान्यतेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्यात येणार आहे.

जलसंपदा विभागाकडून सल्लागार कंपनीने सादर केलेल्या अहवालाच्या छाननीचे काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प अहवाल अंतिम मान्यतेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. त्यामुळे हा महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल पडले असल्याचे मानले जात आहे.

बोगदाच का?
- खडकवासला धरणातून कालव्यातून सोडले जाणारे पाण्याचे बाष्पीभवन, गळती, चोरी आदींमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया
- कालव्यात पडणाऱ्या कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित होते.
- या पार्श्‍वभूमीवर खडकवासला धरण ते फुरसुंगी २५ किलोमीटर लांबीचा बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना
- जलसंपदा विभागाकडून सल्लागार कंपनीची नियुक्ती
- कंपनीकडून माती परिक्षणाचे काम पूर्ण
- बोगद्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू
- दोन दिवसांपूर्वी सल्लागार कंपनीकडून प्रकल्पाचा प्रारूप सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) जलसंपदा विभागाकडे सादर

असा असेल बोगदा...
१) ७.८० मीटर रुंद
२) ३.९० मीटर उंच
३) १.९५० मीटर गोलाकार उंची
४) ‘डी’ आकार
५) खडकवासला ते फुरसुंगी पाणी नेण्याचा प्राथमिक आराखडा निश्‍चित
६) बोगद्यामुळे कालव्याची क्षमता एक हजार ५१० क्‍युसेक्‍स होणार
७) सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार
८) प्रकल्प पूर्ण झाल्यास सुमारे अडीच टीएमसी पाणी वाचणार
९) हे जादा पाणी शहरासाठी तसेच ग्रामीण भागाला शेतीसाठी देणे शक्‍य होणार

व्यवहार्य आर्थिक गणित...
- तब्बल २५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी नेण्याच्या कामासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च
- साधारणतः एक टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष धरण उभारणे यासाठी सुमारे एक हजार कोटीचा खर्च
- कृष्णा पाणी तंटा लवाद प्राधिकरणानुसार पुणे जिल्ह्यात नवे धरण बांधणे शक्‍य नाही
- नवीन धरण बांधायचे झाल्यास भूसंपादन, पुनर्वसन अशा अनेक गोष्टी आहेत
- त्यातच अडीच टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये लागू शकतात
- त्यामुळे बोगद्यातून पाणी नेणे हा प्रकल्प आर्थिकदृष्टया व्यवहार्य, किफायतशीर ठरणार

खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी योजनेचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने नुकताच प्रारूप आराखडा सादर केला आहे. त्यांचे छाननी करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तो राज्य तांत्रिक सल्लागार कंपनीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
- एच. व्ही. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग