Flyover Tendernama
पुणे

Pune : 'त्या' डबल डेकर फ्लायओव्हरचे काम अखेर सुरू

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण, बाणेर आणि औंधकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आचार्य आनंदऋषीजी चौकातील (पुणे विद्यापीठ चौक) दुमजली उड्डाणपुलाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

या पुलासाठी उभारण्यात येणाऱ्या ४२ पैकी ४० खांबांचे काम पूर्ण झाले आहे. तर मुख्य चौकात पुलासाठी लागणारे ५५ मीटर लांबीचे आणि १८ ते २० मीटर रुंदीचे लोखंडी स्पॅन दिल्लीहून पुण्यात दाखल झाले आहेत. लवकरच तेही बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडी’ने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल २०२० मध्ये पाडण्यात आला. त्या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना यापूर्वी झालेल्या ‘पुमटा’च्या बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र विद्यापीठ चौकातील सेवा वाहिन्या हलविण्याचे काम महापालिकेकडून वेळेत पूर्ण झाले नाही. तर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, म्हणून पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर बॅरेकेडींग करण्यास ‘पीएमआरडीए’ला परवानगी दिली नाही. त्यामुळे या चौकातील काम सुरू होण्यास विलंब झाला. त्यातच मध्यंतरी जी- २० परिषदेमुळे पुलाचे काम आणखी लांबणीवर पडले.

अखेर जुलै २०२३ मध्ये या कामाला मुर्हूत लागला. गणेशखिंड रस्त्यावर ज्या ठिकाणी पूल सुरू होणार आहे, त्या ई-स्क्वेअर आणि बाणेर येथे ज्या ठिकाणी पूल उतणार आहे, त्या ठिकाणी उड्डाणपुलासाठी एकूण ४२ खांब उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी ४० खांबांचे काम पूर्ण झाले आहे.

मुख्य चौकात उड्डाणपुलाचा खांब (पिलर्स) असल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यावर पर्याय म्हणून या चौकात एकही खांब न उभारता दोन खांबांमध्ये ५५ मीटरचे अंतर ठेऊन लोखंडी स्पॅन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मेट्रोच्या दोन खाबांमधील अंतर हे ३८ मीटरचे आहे. त्यासाठी चौकात हे अंतर जवळपास दुप्पट ठेवण्यात आले आहे.

दिल्ली जवळील नोईडा येथे तयार करण्यात आलेले ५५ मीटर लांबीचे स्पॅन पुण्यात दाखल झाले आहेत. लवकरच ते टाकण्याचे काम आता सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता चौकात खांब उभारण्याची गरज राहिलेली. पुण्यात दाखल झालेले हे ५५ मीटर लांबीचे आणि सुमारे १८ ते २० मीटर रुंदीचे हे स्पॅन टाकण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

शहरात एवढ्या मोठ्या लांबीच्या स्पॅनवर उभारण्यात येणार हा पहिलाच उड्डाणपूल ठरणार आहे, अशी माहिती ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता आणि मेट्रो प्रकल्प समन्वयक रिनाज पठाण यांनी दिली.