पुणे (Pune) : आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी लोहगाव विमानतळ (Lohegaon Airport) सज्ज करण्याच्या दृष्टीने विमानतळाच्या धावपट्टीमध्ये वाढ करण्यासाठी हवाई दलाने (Indian Airforce) कंबर कसली असून, त्या दृष्टीने सध्या वेगाने प्रयत्न सुरू आहेत.
गुरुवारी महापालिका प्रशासन व हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची बैठकही झाली. यात लोहगावला ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी रस्ता देण्याच्या विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. शुक्रवारी महापालिका व हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून पर्यायी रस्त्यासाठी सर्व्हेक्षण होईल, त्यातून अंतिम पर्याय निवडल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
हवाई दलाच्या ताब्यात असलेल्या लोहगाव येथील विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी शहरातील व्यापार, उद्योग क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती. त्याची दखल घेत केंद्र सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक धावपट्टी वाढविण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत.
हवाई दल व महापालिका प्रशासनाची बुधवारी यासंदर्भात बैठक झाली होती. त्यात धावपट्टी वाढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून विकफील्ड चौकातून लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्याला पर्यायी रस्ता देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. दरम्यान, गुरुवारी महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत हवाई दलाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली.
या वेळी हवाई दलाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी ग्रुप कॅप्टन संजय पिसे, ग्रुप कॅप्टन मनोज गेरा, विंग कमांडर पी. सजनी, गॅरिसन इंजिनिअर के. स्वामी, डिओ हर्ष, महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, उपायुक्त महेश पाटील, भूसंपादन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील आदी उपस्थित होत्या.
तत्पूर्वी, महापालिका व हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सर्वेक्षण केले. हवाई दल व महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये रस्त्यांच्या पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली.