PM Awas Tendernama
पुणे

Pune : PM आवासच्या घरांची प्रतीक्षा संपेना; सातशेहून अधिक नागरिक का आहेत ‘वेटिंग’वर?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : आर्थिक दुर्बल घटकांसाठी पुणे महापालिकेने (PMC) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) आत्तापर्यंत दोन हजारांहून अधिक घरांचा ताबा नागरिकांना दिला आहे. मात्र त्याचबरोबर घर मिळणाऱ्यांची प्रतीक्षाही वाढत आहे. आत्तापर्यंत सातशेहून अधिक नागरिक ‘वेटिंग’वर असून, आम्हाला घर कधी मिळेल? या एकमेव आशेकडे शेकडो नागरिक डोळे लावून बसले आहेत. मात्र तांत्रिक कारणांमुळे संबंधित नागरिकांना घरे मिळण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची सद्यःस्थिती आहे.

शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यास सुरवात केली. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने हडपसर, खराडी व वडगाव खुर्द या भागांत प्रकल्प उभारणीस सुरवात केली होती. यातील तिन्ही ठिकाणच्या प्रकल्पांची कामे आता पूर्ण झाली आहेत. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेतील घरांचा लोकार्पण सोहळा झाला होता.

योजनेच्या लाभासाठी अटी

- तीन लाख रुपयांपर्यंतची उत्पन्न मर्यादा

- संबंधित व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावर अन्य कुठे घर असू नये.

७०४ जणांचे प्रतीक्षेत

महापालिकेकडे आतापर्यंत तब्बल ७०४ जणांनी अर्ज केले असून, ते प्रतीक्षा यादीत आहेत. मात्र उपलब्ध घरे आणि प्राप्त अर्ज यामध्ये मोठी तफावत असल्याने प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना घर कुठून मिळणार ? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, प्रतीक्षेतील नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका पाऊल उचलणार का ? असाही प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची आहे. त्याची अंमलबजावणी महापालिका करत आहे. शहरातील योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील नागरिकांची संख्या वाढली आहे. त्याविषयी आता केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते.

- प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता, महापालिका

मी खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. पुण्यात घर घेणे आम्हाला परवडत नाही. मात्र प्रधानमंत्री आवास योजनेतील घर मिळेल, या अपेक्षेने महापालिकेकडे अर्ज केला होता. मात्र माझे नाव प्रतीक्षा यादीत आले आहे. सरकारने घरांची संख्या वाढविल्यास आमच्यासारख्या कष्टकरी नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

- अर्जदार, प्रधानमंत्री आवास योजना

योजनेची सद्यःस्थिती

- एकूण घरांची निर्मिती - २ हजार ६५८

- ताबा दिलेल्या घरांची संख्या - २ हजार २३२

- ताब्याच्या प्रतीक्षेत असलेली घरे - ४२६

- घरांच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची संख्या - ७०४

असे आहेत प्रकल्प

- हडपसरमधील तीन प्रकल्पांतील घरांची संख्या - ७६४ (शिल्लक - १७५, प्रतीक्षेत - २४२)

- खराडी प्रकल्पातील घरांची संख्या - ७८६ (शिल्लक - ८२, प्रतीक्षेत - १५६)

- वडगाव खुर्द प्रकल्पातील घरांची संख्या - १ हजार १०८ (शिल्लक - १६९, प्रतीक्षेत - ३०९)