Pothole Tendernama
पुणे

Pune : पुण्यातील रस्त्यांची लागली वाट! दुरुस्त करताना प्रशासनाची का होतेय दमछाक?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : खड्डे पडून चाळण झालेले शहरातील रस्ते दुरुस्त करताना प्रशासनाची दमछाक झाली आहे. दुसरीकडे पथ विभाग ९३ रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ७५ कोटी रुपयांची टेंडर (Tender) काढणार आहे. यात सलग एका रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी ते छोट्या तुकड्यांमध्ये केले जाईल. अशा रस्त्यांची संख्या ६५ असल्याने तेथे डांबरीकरणाची ढिगळे दिसतील.

बहुतांश चांगले असलेले व केवळ थोडा भाग खराब असलेले रस्ते निवडून डांबरीकरण केले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. शहरात गेल्या पाच- सहा वर्षांत पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्यांसाठी एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांची खोदाई झाली आहे. याशिवाय मोबाईल कंपन्या, इंटरनेट, महावितरण, एमजीएनएल यांच्या कामांसाठीही खोदाई झाली आहे.

दोन पेक्षा जास्त वेळा खोदाई झाल्याने महत्त्वाच्या अनेक रस्त्यांची वाट लागलेली आहे. यामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे महापालिकेवर टीका होत आहे.

३०० कोटींचे डांबरीकरण...तरीही खड्डे

प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी महापालिकेने सहा पॅकेजमध्ये ३०० कोटी रुपयांच्या टेंडर काढल्या होत्या. त्यातून एकूण १०० किलोमीटर भागांचे डांबरीकरण करण्यात आले. या कामांना तीन वर्षांचा दोषदायित्व कालावधी (डीएलपी) आहे. त्यामुळे या काळात खड्डे पडल्यास, रस्ता खचल्यास संबंधित ठेकेदाराला दुरुस्ती करून द्यावी लागते. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, धायरी यांसह अन्य भागांतील रस्त्यांवर खड्डे पडल्याने पुन्हा डांबरीकरण करावे लागले आहे.

आणखी दोन पॅकेजमध्ये टेंडर

गेल्या वर्षी सहा पॅकेजमध्ये ३०० कोटींचे डांबरीकरण केले गेले. यंदा सात आणि नऊ अशा दोन पॅकेजमध्ये ३८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल. त्यासाठी एक टेंडर ३५ कोटी, तर दुसरे सुमारे ४० कोटी रुपयांचे आहे. या खर्चाला एस्टिमेट कमिटीने मान्यता दिली असून आता टेंडर प्रक्रिया राबविली जाईल.

कामाकडे द्यावे लागणार लक्ष

या टेंडरनुसार शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर अवघ्या काही ठिकाणी ५५ मीटर, ७० मीटरचे डांबरीकरण केले जाईल. अनेक ठिकाणी हे अंतर २०० मीटरपेक्षा कमी आहे. एवढ्या छोट्या अंतराचे डांबरीकरण ठेकेदाराने केले की नाही हे नागरिकांच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे या कामाकडे प्रशासनाला व्यवस्थित लक्ष द्यावे लागेल.

महापालिकेने रॅम्प प्रणालीचा वापर करून शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानुसार पूर्ण खराब झालेल्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर सर्वेक्षणात बहुतांश रस्ता चांगला असल्याचे व काही मीटरचा भाग खराब असल्याचे दिसून आले. अशा रस्त्यावर पूर्ण डांबरीकरण करणे योग्य नाही, पण त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. त्यामुळे तुकड्या तुकड्यात डांबरीकरण केले जाईल.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग

पुण्यातील रस्ते

एकूण लांबी ः २ हजार किलोमीटर

जुनी हद्द ः १४०० किलोमीटर

समाविष्ट ३४ गावांतील अंतर ः ६०० किलोमीटर

डांबरी रस्ते ः १५०० किलोमीटर

सिमेंट काँक्रिटचे रस्ते ः ४००

कच्चे रस्ते ः १०० किलोमीटर