Property Tax Tendernama
पुणे

Pune : थकबाकीचा 'डोंगर' फोडताना पुणे महापालिकेची दमछाक

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नागरिकांनी मिळकतकर (Property Tax) वेळेत भरावा, यासाठी महापालिका प्रशासन दरवर्षी बक्षीस योजना, सवलती देत आहे. तरीही थकबाकीदारांची संख्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. सध्या पाच लाख ९८ हजारांहून अधिक थकबाकीदार असून, त्यांच्याकडे आठ हजार चारशे कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत आहे.

ट्रिपल टॅक्‍स, सरकारी मालमत्ता, न्यायप्रविष्ट प्रकरणे यांच्यासह अन्य घटकांकडे मिळकतकर थकीत ठेवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला जात असला, तरीही हजारो कोटी रुपयांची थकबाकी वसुली करताना महापालिका प्रशासनाची दमछाक होत असल्याची सद्यःस्थिती आहे.

महापालिका प्रशासनाने मुदतीत संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्यांसाठी राबविलेल्या बक्षीस योजना व सवलतींमुळे मिळकत धारकांना प्रोत्साहन मिळते. परिणामी, निवासी मिळकत धारकांकडून महापालिकेच्या आकर्षक योजनांना चांगला प्रतिसाद दिला जातो. त्यामुळे यंदा ३१ जुलैपर्यंत साडेसात लाखांहून अधिक नागरिकांनी मिळकतकर भरण्यास प्राधान्य दिले. त्यांच्याकडून एक हजार २९६ कोटी रुपयांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होण्यास मदत झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. मात्र, व्यावसायिक व सरकारी मिळकती यांच्याकडून महापालिकेने दिलेल्या मुदतीत कर भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

मुदतीत मिळकतकर न भरल्यास दरमहा दोन टक्के व्याजाचा दंड होण्यास सुरवात होते. व्याजामध्ये दरमहा वाढ होऊन मिळकतकर व त्यावरील व्याज वाढत जाऊन अखेर संबंधित प्रकरणे न्यायप्रविष्ट झाल्याने प्रलंबित राहतात. दुसरीकडे सरकारी मालमत्तांचे मिळकतकर भरण्याचे प्रमाणही कमी आहे. ट्रिपल टॅक्‍स, दुबार व वादग्रस्त प्रकरणातील कर थकबाकीचे प्रमाण अधिक आहे. अशा प्रकारे विविध घटकांकडून थकबाकी वाढत आहे. त्या तुलनेत, करवसुलीचे उपाय व अंमलबजावणी मर्यादित स्वरूपाची असल्याचे दिसते.

नोटीस, टाळे व लोकअदालत
थकबाकीदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसूल करण्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. थकबाकीदारांना न्यायालयामार्फत नोटीस बजावण्यापासून ते व्यावसायिक मालमत्तांना टाळे (सील करणे) ठोकण्यापर्यंतची कारवाई महापालिका करत आहे. तसेच लोकअदालतीच्या माध्यमातून थकबाकीची अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यावरही महापालिका प्रशासन भर देत असल्याचे असल्याचे करसंकलन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आकडे बोलतात
- शहरातील एकूण मिळकती - १४ लाख
- एकूण थकबाकीदार - ५ लाख ९८ हजार २२९
- थकीत रक्कम - ८ हजार ४३७ कोटी
- मिळकतकर भरणाऱ्यांची संख्या (३१ जुलैपर्यंत) - ७ लाख ६२ हजार ५३९
- मिळकतकर भरणाऱ्यांची एकूण रक्कम (३१ जुलैपर्यंत) - एक हजार २९६ कोटी

मिळकतकर न भरणाऱ्या व्यावसायिक मिळकतींना टाळे ठोकण्याची कारवाई केली जाते. लोकअदालतीमार्फतही प्रकरणांचा निपटारा करून मिळकतकर भरण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- वरिष्ठ अधिकारी, मिळकतकर विभाग