pune Tendernama
पुणे

Pune : ठेकेदारांच्या भांडणात पुणे महापालिका टेंडर काढायलाच विसरली

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरात डेंगी, चिकुनगुनियाच्या साथीने थैमान घातले आहे. घराघरांत सर्दी, तापाने फणफणलेले रुग्ण आहेत. तरीही महापालिकेचा आरोग्य विभाग खोटी आकडेवारी देत आहे. औषध फवारणी करत नाही, असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांच्या दालनात जोरदार आंदोलन केले. यावेळी हातामध्ये फलक घेऊन घोषणाबाजी केली.

शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, विशाल धनवडे, वसंत मोरे, अविनाश साळवे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट आदी यामध्ये सहभागी झाले होते. महापालिका आयुक्त भेटण्यास विलंब झाल्याने या पदाधिकाऱ्यांनी दालनात ठिय्या मांडून 'आयुक्तसाहेब बाहेर या', 'महापालिका प्रशासनाचा निषेध', 'प्रशासन बसले सत्तेवर पुणेकर मात्र वाऱ्यावर' अशा घोषणा सुरू केल्या.

आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची बैठक संपल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. आयुक्तांकडून प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती दिली जात असताना ही माहिती खोटी आहे, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिका प्रशासन डेंगीचे रुग्ण आढळल्यावरच फवारणी करते, पण प्रतिबंधक उपाय म्हणून त्यापूर्वीच फवारणी करत नाही. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. तसेच फवारणीचे कामगार घेण्यासाठी ठेकेदारांच्या भांडणात टेंडर काढले नाही, असेही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.