Pothole Tendernama
पुणे

Pune : महापालिकाच खड्ड्यांच्या प्रेमात! का करताहेत पुणेकर असा आरोप?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वाहतुकीस योग्य असतो, त्याला रस्ता म्हणतात, असे आम्ही शाळेत शिकलो, परंतु चांगले रस्ते कसे असतात, हे आमच्या मुलांना दाखवायला कोठे न्यायचे, हा आमच्यापुढे प्रश्न आहे. वर्षानुवर्षे परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने रस्त्यांवरील खड्डे महापालिकेने दत्तक घेतले आहेत का, असा संतप्त सवाल कोथरूड मधील नागरिकांकडून विचारला जात आहे.

कांचन कुंबरे म्हणाल्या की, विविध वाहिन्या टाकण्यासाठी महर्षी कर्वे पुतळा ते शांतीबन व आशिष गार्डन ते कोथरूड पोलिस ठाण्यापर्यंत रस्त्यावर खोदकाम केले होते. त्यानंतर हा रस्ता व्यवस्थित करणे आवश्यक होते. तो न झाल्याने येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्याची जबाबदारी कोणी घेईल, असे वाटत नाही. किमान रस्ता व्यवस्थित तरी करुन द्यायला हवा.

प्रा. सागर शेडगे म्हणाले की, ड्रेनेज व पावसाळी चेंबरची झाकणे रस्त्याच्या पातळीपासून खाली आहेत. रस्ते व पेव्हींग ब्लॉक जेथे जोडले गेले आहेत, तेथे मोठ्या फटी पडलेल्या आहेत. त्यात स्कुटीसारख्या वाहनांची चाके अडकून अपघात होत आहेत.

चेंज इंडियाचे संस्थापक सचिन धनकुडे यांनी सांगितले की, वाहतुकीसाठी रस्ता मोकळा व खड्डेविरहीत असायला हवा. नागरिकांना चालता येईल, असा पदपथ हवा, मात्र सर्वसामान्य नागरिकांची ही छोटीशी अपेक्षादेखील पूर्ण केली जात नाही. हे येथील समस्त पुढाऱ्यांचे, धोरणकर्त्यांचे अपयश आहे.

सिद्धिविनायक गणपती मंदिराचे संचालक अनंत सुतार यांनी नमूद केले की, रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेची यंत्रणा आहे, परंतु ही यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याचे जाणवत नाही. खड्डा दुरुस्ती म्हणजे रस्त्यावर खडी पसरविणे, असा यांचा समज असावा. चुकीच्या पद्धतीने ही यंत्रणा काम करत असल्याने रस्ता कोठेही समतल राहिलेला दिसत नाही. उंचवटे, उतार, खड्ड्यांना तोंड देत वाहने चालवावी लागतात.

स्थानिक रहिवासी कविता शिंदे म्हणाल्या की, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आमची हाडे खिळखिळी झाली आहेत. डॉक्टरांची बिले भरण्यासाठी कर्ज घ्यावे लागतेय. गाड्यांच्या दुरुस्तीवरचा खर्च वाढला आहे. बसने प्रवास करावा, तर बसची संख्या कमी असल्यामुळे गर्दीत उभे राहून धक्के खात प्रवास करावा लागतो. मेट्रो सगळीकडे नाही. नागरिकांच्या या प्रश्नाकडे कोणीही गांभीर्याने पहात नाही.

सागर खळदकर यांनी सांगितले की, रस्ता, पदपथ बनविण्यासाठी व दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा खर्च होतो, पण ज्यांच्यामुळे रस्ता खराब होतो त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांकडून किती दंडात्मक कारवाई झाली, हे प्रशासनाने सांगावे.

तातडीचे काम आहे, असे सांगत विविध वाहिन्यांसाठी रस्ते खोदले जातात, परंतु दुरुस्त करताना ते पूर्वीसारखे केले जात नाही. लोक पथविभागाला जबाबदार धरून नावे ठेवतात. यासंदर्भात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खोदकाम विषयावर सुधारित धोरण ठरवावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.

- अभिजित डोंबे, अभियंता पथ विभाग, महापालिका