PMC Pune Tendernama
पुणे

Pune : महानगरपालिकेने 'करून' दाखविले! पुणेकर झाले खुश!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ११ ऑगस्टपासून पुन्हा एकदा कार्यरत झाले आहे. सहा जुलैपासून हे नाट्यगृह दुरुस्तीच्या कामांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ४० दिवसांत नाट्यगृह पुन्हा सुरू होईल, असा शब्द प्रशासनाने दिला होता. हा शब्द पाळत ११ ऑगस्टला पुन्हा एकदा या नाट्यगृहाची दारे रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षकांसाठी खुली झाली. पहिल्याच आठवड्यात झालेल्या नाट्यप्रयोगांना रसिकांनी ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद दिला.

या नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणेत अनेक दिवसांपासून बिघाड झाला होता. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण यंत्रसंच बदलणे आवश्यक होते. त्यासाठी व इतर काही किरकोळ दुरुस्त्यांसाठी सहा जुलैपासून ४० दिवसांसाठी नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पावसाळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि नाटकांची संख्या तुलनेने कमी असल्याने या काळात दुरुस्ती पूर्ण करण्याचा हा प्रयत्न होता. मात्र, हे काम रखडल्यास दीर्घकाळ नाट्यगृह बंद राहील, अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु, प्रशासनाने ही भीती खोटी ठरवत नाट्यगृहातील काम वेळेत पूर्ण केले.

नाट्यगृहातील देखभाल-दुरुस्तीचे कामेही बहुतांशी पूर्ण झाली आहेत. प्रेक्षागृहात नवीन यंत्रसंच बसविण्यात आल्याने वातानुकूलन यंत्रणेची समस्या दूर झाली आहे. सांडपाणी वाहिनीत बिघाड झाला होता. त्याची दुरुस्ती अंतिम टप्प्यात आहे. या व्यतिरिक्त प्रेक्षागृहातील काही खुर्च्यांची डागडुजी, मेकअप रुममधील आरसे व दिव्यांची दुरुस्ती, ध्वनीयंत्रणेतील काही सुधारणा, अशा किरकोळ दुरुस्त्याही करण्यात आल्या आहेत, अशी माहिती नाट्यगृहाच्या व्यवस्थापक सुप्रिया हेंद्रे यांनी दिली.

हे नाट्यगृह पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यातील नाट्यप्रयोगांना रसिकांनी ‘हाऊसफुल्ल’ गर्दी केली होती. कोथरूड परिसरातील या नाट्यगृहाला रसिकांचा नेहमीच प्रतिसाद मिळत असतो. हाच कल या आठवड्यातही पाहायला मिळाला. पुढील तारखांसाठीही नाट्यगृह आरक्षित झाले आहे.

महापालिकेच्या विद्युत आणि भवन विभागासह सर्व विभागांनी सहकार्य केल्यामुळे वेळेत काम पूर्ण झाले. वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीसाठीच नाट्यगृह बंद ठेवले होतो. ते काम पूर्ण झाल्याने नाट्यगृह खुले केले आहे.
- चेतना केरुरे, उपआयुक्त, सांस्कृतिक विभाग

महापालिका प्रशासनाने आश्वासन पाळत दिलेल्या तारखेला नाट्यगृह खुले केले. त्याबद्दल प्रशासनाचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार.
- समीर हंपी, नाट्य व्यवस्थापक