Road Work, Contractor Tendernama
पुणे

Pune: ठेकेदाराच्या आले मना, तेथे कोणाचे काही चालेना!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुळशी तालुक्यातून कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने (Contractor) रस्ता तर अर्धवट ठेवलाच, परंतु रस्त्याचे काम करणाऱ्या तालुक्यातील छोट्या-छोट्या कंत्राटदारांची बिलेही रखडली. कामगारांची ने-आण करणाऱ्या वाहतूक जीप, खोदकामासाठी जेसीबी पुरविणाऱ्या तालुक्यातल्या नवोदित उद्योजकांचेही श्रमाचे पैसे ठेकेदाराने अद्याप दिले नाहीत. महावितरणचे सुमारे एक कोटीच्यापुढचे वीजबिल; तर महसूल विभागाचीही ३५ कोटी रुपये रॉयल्टीही थकविली आहे.

रोडवेज सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने या कामाचा ठेका घेतला होता. रस्त्यासाठी लागणाऱ्या डबर आणि क्रशरसाठी कंपनीने जामगाव येथील काही शेतकऱ्यांची जागा विकत घेतली. त्याठिकाणी कंपनीने डांबर निर्मिती, खडीमशीन, रेडीमिक्स मशिनरी प्लांट उभारला. कंपनीचे येथे खाणकामही चालू होते. याठिकाणी सुमारे साडेतीनशे कामगार विविध प्रकारचे काम करीत होते.

येथील मशनरीसाठी लागणारा वीजपुरवठा महावितरणकडून होत होता. सुरवातीला वीजबिल वेळेवर भरले जात होते. परंतु, नंतर भरले गेले नाही. थकीत वीजबिलाचा आकडा सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत पोचला. त्यामुळे कालांतराने महावितरणने येथील वीजपुरवठा खंडित केला. महसूल विभागाच्या गौण खनिज विभागाने चाळीस कोटी रुपयांची रॉयल्टी लावली होती. त्यातील पाच कोटी रुपये भरले. परंतु पस्तीस कोटी रुपये मात्र अद्यापही भरले नाहीत.

याच ठिकाणी ठेकेदाराने सारीका संतोष ठोंबरे यांची काही जागा भाडेतत्वावर घेतली. तसेच, त्यांचे उपाहारगृहही भाड्याने घेतले. परंतु भाडेकरारानुसार सुरवातीला काही महिने भाडे मिळाले. परंतु नंतर मात्र भाड्यापोटी एक रुपयाही दिला नाही. रस्त्याचे आमिष दाखवून किरण ठोंबरे यांच्याकडून ११ गुंठे जागा विकत घेतली. त्यांच्या जागेत असलेला पाण्याचा स्रोत, खाण एका रात्रीत बुजवून टाकली.

येथे काम करणाऱ्या कामगारांना कामावर ने आण करण्यासाठी चार ते पाच प्रवासी जीपही ठेकेदाराने घेतल्या होत्या. त्याचे महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये बिल होत होते. सुरवातीचे काही महिने बिल जीपमालकांना मिळाले. परंतु नंतर ते बंद झाले. जीपचालकांचे सुमारे आठ ते दहा लाखाचे बिल ठेकेदाराकडून येणे बाकी आहे.

प्लांटच्या आणि कामगारांना लागणारे पाणी पुरविण्यासाठी याच भागातील काही नवउद्योजकांनी पाण्याचे टॅंकर पुरविले. त्यांचेही काही बिल ठेकेदाराने लटकवले आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कामासाठी पोकलेन आणि जेसीबी देणाऱ्या युवा उद्योजकाचेही कोटीच्या घरातील बिल ठेकेदाराने दिले नाही. वारंवार मागूनही बिल न मिळाल्याने एका कंत्राटदाराने जामगाव येथील प्लांटच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच टॅंकर आडवा लावून ठेवला आहे.

कामगारांचीही पगार रखडला
या प्लांटवर सुमारे साडेतीनशे कामगार काम करीत होते. परंतु त्यांचाही काही पगार रखडविला गेला. त्यामुळे काहींनी काम सोडून दिले. सध्या येथे सात ते आठ कामगार बिनपगारी मशिनरी सांभाळतात. भीक मागून पोटाची खळगी भरण्याची त्यांच्यावर वेळ आली. केवळ आशेवर ते आजही कामावर रुजू आहेत. तालुक्याबरोबरच तालुक्याबाहेरील वेगवेगळे काम करणाऱ्या कंत्राटदारांचीही मोठ्या रकमेची बिले ठेकेदाराने दिली नाही.