Mahajyoti Tendernama
पुणे

Pune : 'महाज्योती'तील कर्मचाऱ्याशी संबंधित संस्थेलाच दिले कंत्राट? कोणी केली चौकशीची मागणी?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) इतर मागासवर्गीय आणि अन्य विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते. परंतु, याच संस्थेतील कर्मचाऱ्याच्याच नावे असलेल्या ‘ॲकॅडमी’ला दोन हजार उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी कंत्राट मंजूर केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राज्य समन्वयक रमेश पाटील यांनी केली आहे.

मे -२०२२ मध्ये ‘महाज्योती’कडून ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील नेट-सेट उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. संस्थेच्या कर्मचाऱ्याच्या ॲकॅडमीबरोबरच अन्य तीन संस्थांनी टेंडर भरले होते. परंतु, अन्य तीन संस्थांचे कंत्राट तांत्रिक बाबींवरून रद्द ठरविण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्याच्या ॲकॅडमीला नियमांना डावलून कंत्राट देण्यात आले. त्यामुळे याप्रकरणी चौकशीची मागणी पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याने आपली बाजू मांडताना, ‘‘संबंधित ॲकॅडमीतून मी नोव्हेंबर २०१९ मध्ये राजीनामा दिला असून, त्या ॲकॅडमीशी काहीही संबंध नाही,’’ असे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच संबंधितांवर कारवाई करून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करावी, अशी तक्रार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे केली आहे. योग्य कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल.

- रमेश पाटील, राज्य समन्वयक, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

‘महाज्योती’ संस्थेकडे यासंदर्भात लेखी तक्रार आल्यास, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल. या समितीमार्फत चौकशी केली जाईल.

- राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती