पुणे (Pune) : दिवस-रात्र सुरू असलेल्या डंपरच्या वाहतुकीमुळे वडाचीवाडीतील नागरिकांची दैनंदिन दिनचर्याच धोक्यात आली आहे. गावातून अवेळी होणाऱ्या या जड वाहतुकीवर प्रशासनाने कडक कारवाई करून निर्बंध घालावेत, अशा मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वडाचीवाडी गावातून खडी वाहून नेणाऱ्या डंपरची सतत ये-जा सुरू असते. खडी वाहताना कोणतेही नियम पाळले जात नाहीत. रात्री-अपरात्री या वाहनांमुळे आणि त्यांच्या हॉर्नच्या कर्कश आवाजाने नागरिकांची झोप उडते. विद्यार्थ्यांनाही एकाग्र होऊन अभ्यास करता येत नाही.
तसेच या वाहनांमुळे रस्त्यावर वारंवार कोंडी होत असून यामध्ये अडकलेल्या मुलांना शाळेत जाण्यास उशीर होत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच गावातून सातत्याने होत असलेल्या या वाहतुकीमुळे येथील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.
डंपरमधून रस्त्यावर सांडलेल्या खडीवर वाहने घसरून होणारे किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहेत. या परिसरात पाच शाळा आहेत. त्यामुळे शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी येथे विद्यार्थ्यांची वर्दळ असते, मात्र रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे दुर्घटनेची शक्यता वाढत असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंतादेखील वाढली आहे.
या परिसरात एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या वाहनांवर त्वरित निर्बंध घालावेत, अशी मागणी ग्रामस्थ शिवाजीराव धनवडे, नवनाथ चव्हाण व संजय धनवडे यांनी केली आहे.
मुख्य मार्गावर जड वाहतुकीस वेळेचे बंधन असते, तसेच गावातून होणाऱ्या वाहतुकीला नियम असायला हवेत. तसे होत नसेल तर प्रशासनाने आमचे पुनर्वसन दुसरीकडे करून गाव रिकामे करून घ्यावे आणि बिनधास्तपणे जड वाहतुकीस मार्ग मोकळा करून द्यावा. किमान आमची मुलेबाळे तरी सुरक्षित होतील.
- जया धनवडे, स्थानिक नागरिक
कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक करून गावातून येणाऱ्या जड वाहनांची तपासणी करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक, कोंढवा वाहतूक विभाग