PMC Tendernama
पुणे

Pune : आयटीआयचे 'ते' मॉडेल पुण्यातही वापरणार; पहिल्या टप्प्यासाठी 3 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील (ITI) विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नवे सॉफ्टवेअर, स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच प्रात्यक्षिक करण्यासाठी इमारतीमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. भुवनेश्‍वर आणि कटक येथील आयटीआयच्या धर्तीवर हे बदल केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात या कामासाठी महापालिकेने दोन कोटी ९० लाख रुपयांचे टेंडर (Tender) काढले आहे.

शुक्रवार पेठेतील शाहू चौकात महापालिकेचे ‘आयटीआय’ आहे. १८८९ मध्ये इंग्रजांनी कैद्यांना तांत्रिक गोष्टींचे शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी ‘धंदे शिक्षणाची शाळा’ या नावाने तंत्रशाळा सुरू केली होती. त्यानंतर १९६३ मध्ये महापालिकेने आयटीआय सुरू केले. या ठिकाणी फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन आणि मेकॅनिकल ड्राफ्ट्समन या चार ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये फिटर या ट्रेडसाठी ४० जागा आहेत, तर उर्वरित तीन ट्रेडसाठी प्रत्येकी २० याप्रमाणे दरवर्षी १०० विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेतात.

महापालिकेची ही जुनी संस्था असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या संस्थेत सुधारणा करण्यासाठी भुवनेश्‍वर आणि कटक येथील आयटीआयप्रमाणे बदल केले जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या सूचनेनुसार आयटीआयमधील शिक्षकांनी मे महिन्यात भुवनेश्‍वर आणि कटक येथे दौरा करून तेथील आयटीआयची पाहणी केली आहे. त्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला असून, त्यानुसार या ठिकाणी काम केले जाणार आहे.

जास्त जागा उपलब्ध करणार

महापालिकेतर्फे सध्या पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात आता आणखी सखोल ज्ञान देण्यासाठी विविध सॉफ्टवेअरद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी संगणक, ६५ इंची स्मार्ट टीव्हीची खरेदी केली जाणार आहे. लॅबमध्ये अद्ययावत यंत्र बसविणे, मॉड्युल खरेदी करणे, आणखी एक नवे शेड मारून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी जास्त जागा उपलब्ध केली जाणार आहे.

केवळ ३७० रुपये शुल्क

पुणे महापालिकेच्या आयटीआयमध्ये चार ट्रेड शिकवले जातात, येथे कायम सेवेतील शिक्षकांची संख्या कमी असली तरी, ‘लेंड-ए-हंड’ या सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या १०० विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश मिळतो. त्यांना प्रत्येकी केवळ ३७० रुपये शुल्क आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये रोजगाराची संधी निर्माण होते.

आयटीआयमध्ये चार ट्रेड असून, दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. भुवनेश्‍वर व कटक येथील आयटीआय देशातील नामांकित संस्था आहेत. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशानुसार येथे पाहणी केली. त्यानुसार आयटीआय अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

- प्रमोद मुळे, प्रभारी प्राचार्य, श्री छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र

महापालिकेचे आयटीआय अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. लेंड-ए-हंड या संस्थेकडून सीएसआर निधीतून ३०० विद्यार्थ्यांना टॅबही दिले आहेत. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा, यादृष्टीने बदल केले जात आहेत.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका