PMC Pune Tendernama
पुणे

Pune : 'तो' पंचतारांकित पाहुणचार पुणे महापालिकेला पडला 30 लाखांना!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरात (Pune City) झालेल्या जी २० (G-20) परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने विदेशी पाहुण्यांना डिनरची मेजवानी आणि दोन वेळा नाश्‍त्याची सोय केली होती. त्यासाठी पंचतारांकित हॉटेलने ‘जीएसटी’सह २९ लाख ९१ हजार ३०० रुपयांचे बिल पुणे महापालिकेला पाठविले आहे. या खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

शहरात जूनमध्ये ‘जी२०’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक देशातील मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते. त्यांच्या पाहुणचारासाठी महापालिकेने जोरदार तयारी केली होती. यामध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गाला डिनरचे आयोजन केले होते.

तसेच ‘जी२०’च्या बैठकीच्या काळातच पुण्यात संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले. या सोहळ्याचा अनुभव परदेशी पाहुण्यांना घेता यावा म्हणून गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर व्यवस्था केली होती. या ठिकाणी पाहुण्यांसाठी नाश्‍त्याची सोय केली होती. तर आगाखान पॅलेस येथे ‘हेरिटेज वॉक’च्या वेळीही नाश्‍ता देण्यात आला.

या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये महापालिकेने दोन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. राज्य सरकारने ‘जी२०’च्या तयारीसाठी महापालिकेला २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. पण निधी अद्याप जमा न झाल्याने महापालिकेतर्फे हॉटेलच्या बिलासाठी २९ लाख ९१ हजार रुपयांचा खर्च केला जात आहे.