Boat, NDRF Tendernama
पुणे

Pune: पुणेकरांना पुरातून बाहेर काढण्यासाठी पालिकेने काढले टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पूर आल्यास बचाव कार्यासाठी जाताना वाहतुकीला सोप्या आणि पाण्यात सुरक्षित असणाऱ्या इनफ्लेटेबल रबर बोट घेण्याचा निर्णय महापालिकेने (PMC) घेतला आहे. यासाठी भांडार विभागाकडून टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू केली असून, आठ बोट घेणार आहेत. ‘एनडीआरएफ’च्या (NDRF) ताफ्यात ज्या दर्जाच्या बोट आहेत, तशा बोट महापालिका खरेदी करणार आहे.

पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर तसेच पवना नदी, मुळा नदीला पूर आल्यानंतर त्याचा फटका पुणे शहरालाही बसतो. त्यामुळे पुराच्या पातळीचा अंदाज घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले जाते.

काही वेळा आणीबाणीची स्थिती निर्माण होऊन नागरिक पुरामध्ये अडकतात, अशावेळी त्यांची सुटका करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे चांगल्या दर्जाच्या बोट असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी गेल्यावर्षी ‘एफआरपी’ प्रकारातील नवीन बोट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, त्या योग्य दर्जाच्या आहेत की नाही याची माहिती महापालिकेला नव्हती.

त्यामुळे ‘एनडीआरएफ’कडे त्याबाबत चौकशी केल्यानंतर या बोटचा वापर चार वर्षापूर्वीच बंद केला आहे. त्यापेक्षा सुरक्षित आणि वाहतूक करण्यासाठी सोप्या असलेल्या इनफ्लेटेबल रबर बोट घेण्याचा सल्ला महापालिकेला देण्यात आला. या बोटीला पाण्यात काटा किंवा अन्य टोकदार वस्तू टोचल्यानंतर धोका निर्माण होत नाही, त्यामुळे ती सुरक्षित आहे. त्यामुळे गेल्यावर्षी काढलेले टेंडर रद्द करण्यात आली.

भांडार विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मागणीनुसार बोट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आठ बोट खरेदी केल्या जाणार आहेत, अशी माहिती भांडार विभागाच्या प्रमुख चेतना केरूरे यांनी दिली.

दोन बोट अग्निशामक दलासाठी

महापालिका आठ बोट खरेदी करणार आहे. त्यापैकी दोन बोटी अग्निशामक दलाकडे असणार आहेत. तर उर्वरित सहा बोटी या क्षेत्रीय कार्यालयांसाठी असतील. शहरातील तलाव व इतर ठिकाणी त्या बचाव कार्यात वापरता येणार आहेत.