PMP Tendernama
पुणे

Pune Tender News : नव्या पीएमपी बसेसचा ‘प्रवास’ का बनलाय खडतर?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : प्रवाशांच्या सेवेसाठी पीएमपीच्या (PMPML) ताफ्यात ५०० सीएनजीवर धावणाऱ्या बस (PMP Bus) दाखल होणार आहेत. यातील ४०० बस या भाडेतत्त्वावरील तर १०० स्व मालकीच्या असणार आहेत.

भाडेतत्त्वावर बसची सेवा सुरू करण्यासाठी सात जणांनी टेंडर प्रक्रियेत भाग घेतला आहे, तर १०० स्व मालकीच्या बस घेण्याकरिता टेंडर प्रक्रियेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नसल्याने पीएमपी प्रशासन चार जूननंतर आचारसंहिता संपल्यावर फेर टेंडर काढणार आहे.

पीएमपीच्या ताफ्यात नवीन बस येण्याचा ‘प्रवास’ दिवसेंदिवस खडतर होत आहे तर दुसरीकडे पीएमपीतील बस गाड्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. बसचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण देखील कमालीचे वाढले आहे. अशा स्थितीत प्रवाशांना टेंडरच्या फेऱ्यातच अडकून पडावे लागणार आहे.

दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे टेंडर प्रक्रियेला बेक लागला. अजूनही आचारसंहिता उठलेली नसल्याने पीएमपीला टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या सर्वांचा परिणाम पीएमपीच्या प्रवासी सेवेवर होणार हे निश्चित आहे. पीएमपी प्रशासनाने सुरुवातीला जूनपर्यंत नवीन बस घेण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र सप्टेंबरपर्यंत तरी नवीन बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार नाही, हे निश्चित आहे.

बसची संख्या कमी

पीएमपीच्या सातपैकी दोन ठेकेदारांची सेवा संपली असल्याने सुमारे २००हून अधिक बस प्रवासी सेवेतून बाद झाल्या आहेत. जून महिन्यात आणखी किमान ६० बसचे आयुर्मान संपणार आहे. सध्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असल्याने पीएमपीने विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरले जाणारे सुमारे २०० बस प्रवासी वाहतुकीसाठी वापरत आहे, मात्र जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर बसचा मोठा तुटवडा जाणवणार आहे. कारण नवीन बस देखील सप्टेंबरमध्ये येणार असल्याने प्रवाशांना बसची संख्या कमी असल्याचा फटका निश्चितच बसणार आहे.

तीन लाख ६५ हजार प्रवाशांची सोय

सीएनजीच्या एका बसमधून दिवसाला सरासरी ७३० प्रवाशांची वाहतूक होते. ५०० बसच्या माध्यमातून दिवसाला किमान तीन लाख ६५ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. जागेअभावी अनेक प्रवाशांना रोजच उभे राहून प्रवास करावा लागतो. बसची संख्या वाढल्यास त्याचे प्रमाण कमी होईल.

भाडेतत्त्वावरील बस सेवेसाठी सात ठेकेदारांनी टेंडर प्रक्रियेत भाग घेतला आहे. याची अजून छाननी सुरू आहे. तर स्व मालकीच्या बस घेण्याच्या टेंडर प्रक्रियेला अपेक्षित असा प्रतिसाद लाभलेला नाही. त्यामुळे आम्ही त्याची फेरटेंडर काढणार आहोत. आचारसंहिता संपल्यावर त्याचे काम सुरू होईल.

- डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे