Pune Traffic Tendernama
पुणे

Pune : टेंडर निघाले, काम सुरू झाले पण ठेकेदारामुळे भारती विद्यापीठ परिसरातील कोंडी तशीच

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. राजमाता भुयारी मार्ग ते त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कामाचे टेंडर (Tender) आधीच निघालेले असतानाही प्रत्यक्षात मात्र मार्च महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू झाले. त्यानंतरही कामाला गती देण्यात आली नसल्याचे दिसून येते.

रस्त्याचे काम अर्धवट केल्यानंतर काही काळ बंद होते. आता काम सुरू करण्यात आले असले तरी एका बाजूची वाहतूक बंद असल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. मुलांच्या शाळेच्या बस सोसायटीमध्ये येऊ शकत नाहीत. ज्येष्ठांनाही रिक्षा मिळविण्यासाठी बरेच अंतर चालावे लागते. नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. परंतु, गती देण्याऐवजी प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

काय आहे सद्यस्थिती

- रस्ता पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदतवाढ

- संथगतीने काम केल्याचा ठपका ठेवत महापालिकेकडून ३० हजारांचा दंड

- वाहतूक पोलिसांकडून कर्मचारी नेमूनही वाहनचालकांना त्रास

- एकेरी रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू

- अर्ध्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम होण्यास लागणार किमान महिनाभराचा कालावधी

- उर्वरित अर्ध्या रस्त्यामध्ये ड्रेनेज आणि पावसाळी वाहिनीचे होणार काम

- संपूर्ण काम होण्यासाठी किमान सहा महिन्याचा अवधी

- काम पूर्ण होईपर्यंत एक बाजू वाहतुकीसाठी राहणार बंद

- पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

वाहनचालकांनी सदर रस्त्याचा वापर न करता कात्रज डेअरी सरहद चौकातून पर्यायी रस्त्याचा वापर करावा. त्रिमूर्ती चौकात जाण्यासाठी किंवा महामार्गावर येण्यासाठी थोडा वळसा घालून जावे, ज्यामुळे चंद्रभागानगर चौकात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही, केवळ या भागातील रहिवाशांनीच हा रस्ता वापरावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पावसामुळे कामाची गती मंदावली होती. परंतु, आता कामाला गती देण्यात आली आहे. रस्त्याच्या एका बाजूच्या खडीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये काँक्रिटीकरण करण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात येणार आहे. एका बाजूचे काम पुढील १५ दिवसांत पूर्ण होईल.

- दिलीप पांडकर, उपअभियंता, पथविभाग, महापालिका

या रस्त्यावरील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. जर कामाला गती देऊन नागरिकांना दिलासा दिला नाही, तर आम्हाला प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल.

- शंकर कडू, स्थानिक नागरिक