Housing Tendernama
पुणे

बजेटमध्ये घर घ्यायचयं; मग पुण्याचा विचार कराच! कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नवीन घर घ्यायचं म्हटलं की, सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न असतो तो म्हणजे त्याची किंमत काय? सदनिका घ्यायची की नाही हे ठरवण्यात तिची किंमत हा प्रमख मुद्दा असतो. त्यामुळेच बजेट होम घेण्यास नागरिकांचे प्राधान्य असते. बजेटचा विचार केला असता, देशातील आठ प्रमुख शहरांपैकी पुणे, अहमदाबाद आणि चेन्नई ही घरे घेण्यासाठी सर्वांत जास्त परवडणारी शहरे असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. (Affordable Housing Index)

परवडणारी घरे असलेल्या शहरांच्या यादीत पहिला नंबर अहमदाबाद व त्यानंतर पुणे आणि चेन्नईचा आहे. सध्या देशात परवडणारी घरे कोणत्या शहरात आहेत, याचा अभ्यास केल्यानंतर ‘नाइट फ्रँक इंडिया’ने यंदाच्या सहामाहीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात परवडणाऱ्या शहरांची यादी देण्यात आली आहे. रेपो दरांमध्ये वाढ झाल्यामुळे गृहकर्जाच्या दरांमध्ये नुकतीच वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील सर्व प्रमुख शहरांमधील बांधकाम क्षेत्राच्या बाजारपेठांमध्ये परवडण्याची क्षमता कमी झाली आहे. मात्र सरासरी कुटुंबासाठी ईएमआय आणि उत्पन्न यांच्यातील ताळमेळाचा मागोवा घेतला असता, २०१० ते २०२१ या काळात देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राला मिळणाऱ्या प्रतिसादाची स्थिती सुधारली आहे. विशेषतः भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कोरोनाच्या काळात रेपोदर दशकाच्या नीचांकी पातळीवर आणला होता. त्यानंतर सध्या सलग दोन वेळा रेपोदर वाढविल्याने घर खरेदीची परवडण्याची सरासरी क्षमता दोन टक्क्यांनी कमी झाले आहे. तर ईएमआयवरील टक्केवारी ६.९७ पर्यंत वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

देशातील प्रमुख आठ शहरांचा परवडणारा निर्देशांक :
(२०२२ - पहिल्या सहामाहीतील स्थिती, सर्व आकडे टक्केवारीत)
मुंबई : ५६
एनसीआर : ३०
बेंगळूर : २८
पुणे : २६
चेन्नई : २६
हैदराबाद : ३१
कोलकता : २७
अहमदाबाद : २२

(स्रोत: नाइट फ्रँक संशोधन अहवाल)

पुण्याची टक्केवारी सुधारली
परवडणाऱ्या घरांच्या निर्देशांकात पुण्याचा दुसऱ्या क्रमांक लागतो. २०१० साली परवडणाऱ्या घरांच्या बाबतीत पुण्याचा निर्देशांक ३९ टक्के होता. २०१९ साली तो २८ टक्क्यांपर्यंत सुधारला. २०२० च्या सुरुवातीस कोरोनाची साथ असतानाही निर्देशांक आणखी सुधारून २६ टक्क्यांपर्यंत आला होता. तर २०२१ मध्ये हा आकडा २४ टक्के होता. यंदा हा निर्देशांक २६ टक्के आहे.

गेल्या काही दिवसांत गृहकर्जाच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे घराची परवडणारी क्षमता आणखी घटली आहे. प्रमुख बाजारपेठांमध्ये सरासरी परवडणारी क्षमता २०० ते ३०० बेसिस पॉइंट्सनी कमी झाली आहे. स्वतःचे घर असावे याबाबतच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. त्यामुळे बाजारातील मागणी कायम राहिल्याने यापुढे तेथील विक्री अबाधित राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे.
- शिशिर बैजल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया