Misal Tendernama
पुणे

Pune : पुण्यातील 'त्या' भूखंडावरील आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला स्थगिती

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बिबवेवाडीतील तीन भूखंडांवरील ‘डोंगरमाथा-डोंगर उतारा’चे आरक्षण उठविण्याच्या निर्णयास मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी स्थगिती दिली. तसेच या संदर्भात फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी नगर विकास खात्याला दिल्या.

बिबवेवाडीतील खासगी मालकीच्या तीन भूखंडांवरील हे आरक्षण उठविण्याचे आदेश नगर विकास विभागाने काढले होते. मात्र त्याचलगत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवरील आरक्षण मात्र कायम ठेवण्यात आल्याने तेथील रहिवाशांमध्ये रोष निर्माण झाला होता. या संदर्भात आमदार माधुरी मिसाळ यांनी पुढाकार घेतला.

तीन भूखंडांवरील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्यास स्थगिती द्यावी, तसेच तेथील नागरिकांच्या घरांवरील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्यात यावे, अशी मागणी मिसाळ यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

दरम्यान, आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या संदर्भात माहिती दिली. तसेच या भूखंडांलगत असलेल्या नागरिकांच्या घरांचा विचार करून डोंगरमाथा आरक्षणाबाबत नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.