Highmast Light Tendernama
पुणे

Pune: कोट्यवधीचा खर्च, पण पथदिव्यांबाबत प्रशासनच का आहे 'अंधारा'त?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वीज बिल भरण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असला तरी त्या तुलनेत सुविधा पुरविण्यात पुणे महानगरपालिका (PMC) कमी अपडत असल्याची परिस्थिती शहरात दिसते आहे.

सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलाखालील ६५ पैकी ३५ पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. अशीच स्थिती डीपी रस्ता, सिंहगड रस्ता, नेहरू रस्‍त्यासह विविध ठिकाणी काही भागांतील दिवे सुरू तर काही बंद आहेत. पण विद्युत विभाग मात्र, अंधारातच असल्याचे समोर आले आहे.

पुणे शहरात १० हजारापेक्षा जास्त पथदिवे आहेत. त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये वर्षाला खर्च केला जात आहे. पथ दिव्यांमधून वीज बचत करण्यासाठी ‘महाप्रित’ या राज्य सरकारच्या संस्थेसोबत करार केला असून, याचे जून महिन्यात प्रत्यक्षात काम सुरू होण्याची शक्यता आहे. विद्युत विभागातर्फे एकीकडे उपाययोजना सुरू असल्या तरी प्रशासनाकडून देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे, राडारोडा, अर्धवट खोदकाम, असमान पातळीमध्ये केलेल्या पॅचवर्कमुळे रस्ते धोकादायक झाले आहेत, अशा स्थितीत रस्त्यावर, उड्डाणपुलावर, उड्डाणपुलाच्या खाली पथदिव्यांचा प्रकाश व्यवस्थित असणे आवश्‍यक असते. पण आठवड्यातील तीन-चार दिवस पथ दिवे सुरू तर उर्वरित दिवस बंद अशी अवस्था अनेक भागात दिसून येत आहे. त्यामुळे वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावरील पथदिवे अनेक दिवस बंद होते, त्याची तक्रार केल्यानंतर हे पथदिवे सुरू केले. मात्र, उड्डाणपुलाखालील पथ दिवे बंद असल्याचे दिसून येते. अतिक्रमण, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे आधीच रस्ता धोकादायक झालेला असताना पथदिवे बंद असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.

महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपासणी करून योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. मात्र, विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता, उप अभियंत्यासह इतर अधिकाऱ्यांना दिवे बंद असल्याचे दिसत नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

४१ लाखांचे दोन टेंडर

जून महिन्यात होणाऱ्या ‘जी २०’साठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये विद्युत विभागाने सुमारे साडेपाच कोटी रुपयांची टेंडर काढली आहेत. यामध्ये शंकर महाराज उड्डाणपुलावरील प्रकाश व्यवस्था सुधारण्यासाठी ९ लाख ७० हजार आणि ३१ लाख ५२ हजार ५५ रुपये अशा एकाच कामाच्या ४१ लाख २२ हजार रुपयांच्या दोन टेंडर काढल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वारगेट उड्डाणपूल ते शंकर महाराज उड्डाणपुलापर्यंत रस्त्यावरील पोल पेंटिंग करून सुशोभित करण्यासाठी ४ लाख ८४ हजार १५४ रुपयांची टेंडर काढली आहे.

कात्रज चौक ते पंचमी हॉटेल दरम्यानच्या पथदिव्यांच्या सुधारणेसाठी १९ लाख ८० हजार ६२६ रुपयांची टेंडर काढली आहे. अर्थसंकल्पात देखभाल-दुरुस्तीसाठी मोठी तरतूद असताना पथदिवे बंद ठेवले जात आहेत. आता पुन्हा तीच कामे ‘जी २०’च्या निमित्ताने केली जात आहेत.

शंकर महाराज उड्डाणपुलावरील दिवे बंद असल्याची तक्रार गेल्या आठवड्यात केली होती, त्यानंतर दिवे सुरू झाले. पण उड्डाणपुलाखालील दिवे मोजले असता ६५ पैकी ३५ दिवे बंद आहेत. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. महापालिका प्रशासनाने देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करू नये.

- आदित्य गायकवाड, नागरिक

शंकर महाराज उड्डाणपुलाखालील दिवे बंद का आहेत, याची चौकशी करून ते त्वरित सुरू केले जातील. तसेच शहराच्या इतर भागातील दिवे सुरू असले पाहिजेत, दिवे बंद असण्याचे काही कारण नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील.

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग