Sinhgad Road Tendernama
पुणे

Pune: सिंहगड रोडवासियांनो कधी थांबणार तुमचा जीवघेणा प्रवास?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम करताना ठेकेदाराने (Contractor) नागरिकांच्या जिवाची काळजी न घेता निष्काळजीपणा सुरू केलेला आहे. या कामावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचेही नियंत्रण नसल्याचे समोर आले आहे.

माणिकबाग येथे दुचाकीस्वाराच्या अंगावर लोखंडी रॉड पडून जखमी झाल्याची घटना घडून तीन दिवस उलटून गेले तरीही ठेकेदाराने याबाबत महापालिकेला अंधारात ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र, हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ठेकेदाराला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पुणे महापालिकेतर्फे सिंहगड रस्‍त्यावर राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत ११८ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधला जात आहे. हे काम ‘टीएनटी’ या कंपनीला दिले आहे. सिंहगड रस्त्यावर वाहनांची वर्दळ असून, ठेकेदाराकडून पुरेशा प्रमाणात सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे वारंवार समोर येत आहे.

चार दिवसांपूर्वी मध्यरात्री दीडच्या सुमारास माणिकबाग येथे गर्डरचे काम सुरू असताना दुचाकीस्वाराच्या अंगावर लोखंडी रॉड पडला. सुदैवाने त्यात त्यास गंभीर दुखापत झाली नाही. हा प्रकार घडल्यानंतर ठेकेदाराच्या कामगारांनी किंवा तेथील अभियंत्यांनी याबाबत महापालिकेला काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे हा प्रकार समोर आला नाही. पण याची तक्रार व व्हिडिओ महापालिका आयुक्तांकडे गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली.

या निष्काळजीपणाबद्दल ठेकेदाराला पाच लाखांचा दंड ठोठावला आहे, तसेच सुरक्षेसाठी बॅरिकेडिंग करणे, जाळी लावणे, मजुरांना सेफ्टिबेल्ट लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रॉड पडण्याची दुसरी घटना

उंचावरून रॉड पडण्याची ही पहिलीच घटना नसून, एका महिन्यापूर्वी अशीच घटना घडली होती. त्यानंतर प्रकल्प विभागाकडे तक्रार केल्याने ठेकेदारासोबत बैठक घेऊन त्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडल्याचे कार्यकारी अभियंता अजय वायसे यांनी सांगितले.

धोकादायक पद्धतीने वेल्डिंग

उड्डाणपुलाचे काम करताना गर्डर तयार करण्यासाठी लोखंडी साचे एकमेकांना जोडण्यासाठी वेल्डिंग केले जाते. या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असताना हे काम रात्री १० वाजेपर्यंत केले जाते. त्यावेळी उडणाऱ्या ठिणग्या रस्त्यावर पडतात, तसेच वाहनचालकांच्या अंगावरही पडतात. या ठिकाणीही काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

याकडे होतेय दुर्लक्ष

- बॅरिकेड काढल्यानंतर त्याचे खिळे पूर्णपणे न काढल्याने वाहने पंक्चर होण्याचे प्रकार

- गर्दीच्या वेळी क्रेन रस्त्यावर उतरवून लोखंडी साहित्य हलविले जात असल्याने कोंडी

- रात्री काम करताना नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

उड्डाणपुलाचे काम करताना लोखंडी रॉड पडल्याचे समोर आल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या ठेकेदाराला पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम त्याच्या बिलातून वळती केली जाईल. काम करताना नागरिकांच्या जिवास धोका होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची सक्त ताकीद ठेकेदाराला दिली आहे. तसेच येत्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेऊ.

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका