Deemed Conveyance Tendernama
पुणे

Pune: संधीचे सोने करा! सोसायटीची जागा मालकी हक्काने करून घ्या

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यासह राज्यातील ज्या गृहनिर्माण संस्थांचे (Housing Society) मानीव अभिहस्तांतरण (Deemed Conveyance) झालेले आहे, अशांसाठी सहकार खात्याकडून आजपासून (ता. ३) विशेष मोहीम सुरू होत आहे. त्यामुळे सोसायट्यांतील रहिवाशांना सोसायटीखालील जागा मालकी हक्काने करून घेण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थंचे अभिहस्तांतरण अद्यापही झालेले नाही, अशा सर्व संस्थांचे अभिहस्तांतरण पूर्ण करण्याच्या सूचना सहकार आयुक्त स्तरावरून देण्यात आल्या आहेत. नव्याने नोंदणीकृत होणाऱ्या सहकरी गृहनिर्माण संस्थांबाबत संस्था नोंदणी झाल्यानंतर चार महिने कालावधी पूर्ण होताच संबंधित तालुका प्रमुखाने विशेष मोहिमेद्वारे अभिहस्तांतरण पूर्ण करण्याच्या सूचना ही आयुक्तांनी दिल्या आहेत.

मात्र जिल्हा स्तरावरोन अद्यापही ठोस कार्यवाही होताना दिसत नसल्याचे निदर्शनास आल्याने सहकार आयुक्त कार्यालयाने मानीव अभिहस्तांतरण पूर्ण करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना विशेष मोहीम राबवून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी सोमवारपासून सुरूवात होणार आहे.

सर्व माहिती मिळणार
प्रत्येक तालुक्‍यात एकूण नोंदणीकृत सहकारी संस्थांपैकी अभिहस्तांतरण झालेल्या, न झालेल्या संस्थांची अद्ययावत यादी ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन व लेखापरीक्षक फेडरेशनचे सहकार्य घेण्यात येणार आहे. मदत कक्षाच्या माध्यमातून अभिहस्तांतरणाची संपूर्ण माहिती, कागदपत्रे, कागदपत्रे कोठून उपलब्ध होतील, अभिहस्तांतरणाच्या प्रस्तावात काही त्रुटी असल्यास त्याबाबत मार्गदर्शन कुठे मिळेल, यांची सर्व माहिती या विशेष मोहिमेत दिली जाणार आहे.

हे लक्षात ठोवा
- बांधकाम व्यावसायिकांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ही इमारत सोसायटीकडे हस्तांतर करणे बंधनकारक आहे.
- अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून ही प्रक्रिया करण्यात येत नसल्याने सहकार विभागाकडून मानीव अभिहस्तांतरण करून देण्यात येते.
- सोसायटीचे हस्तांतर न झाल्यास भविष्यात सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल, तर चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून घ्यायचा असेल तर अडचणी येतात.
- त्यामुळे संबधित जागेची मालकी हक्क असलेला पुरावा म्हणजे सातबारा उतारा अथवा प्रॉपर्टी कार्ड यावर गृहनिर्माण संस्थेचे नाव असणे आवश्‍यक आहे.
- अभिहस्तांतरण झाल्यास सदनिकाधारकांना सर्व हक्क प्राप्त होतात.
- तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा हक्क संपुष्टात येतो.
- त्यामुळे मानीव अभिहस्तांतरण करणे आवश्‍यक आहे.

सोसायट्यांनी मानीव अभिहस्तांतरण करून घ्यावे, यासाठी सहकार खात्यानेच पुढाकर घेऊन ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ती सोमवारपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार आहे. अधिकाधिक सोसायटीधारकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा.
- अनिल कवडे, सहकार आयुक्त