पुणे (Pune) : खंबाटकी घाटामध्ये दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी जुळे बोगदे तयार करण्यात आले असून दोन्हीही बोगद्यांमध्ये तीन पदरी मार्ग आहेत. या बोगद्याचे काम प्रगतिपथावर असून, पुढील वर्षी मार्च २०२३ पर्यंत ते पूर्ण होईल. ६.४३ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पावर ९२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे दिली.
पुणे-सातारा महामार्गावरील (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार) खंबाटकी घाटामध्ये सहा पदरी बोगद्याचे काम येत्या आठ महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच जाहीर केले. तसेच, सातारा- पुणे मार्गावर इंग्रजी एस आकाराचे वळण लवकरच पूर्ण होणार असून यामुळे महामार्गावरील अपघाताची शक्यता कमी होणार असल्याचा दावाही गडकरी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा होत असून संपर्कातून समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे. देशाला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता असल्याचेही मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
बोगदा संपर्क वाढविणारा असून प्रवाशांच्या वेळेत आणि पैशातही बचत होणार आहे. पुणे- सातारा मार्ग आणि सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाटातील प्रवासाचा सध्याचा वेळ अनुक्रमे ४५ मिनिटे आणि १० ते १५ मिनिटे आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासाचा वेळ केवळ पाच ते दहा मिनिटांचा असेल.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री