Khed Shivapur Toll Plaza Tendernama
पुणे

Pune Satara Highway : रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला वेळ नाही; मग टोल द्यायचा कशाला?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : पुणे-सातारा महामार्गावर शिवापूर व शिवरे (ता. भोर) येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सेवा रस्त्यावरून वळवलेल्या वाहतुकीमुळे कोंडी होत आहे. मात्र, ठेकेदार किंवा महामार्ग प्राधिकरण याकडे डोळेझाक करत आहेत. त्याचबरोबर टोल वसुली २४ तास सुरू आहे. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यायला टोल प्रशासनास वेळ नसेल, तर टोल का? असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला आहे.

मागील पंधरा दिवसांपासून रस्त्याची ही परिस्थिती आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन अर्धा किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक ते दीडतास वेळ लागत आहे. समाजमाध्यमावर देखील याबाबत सर्वत्र टीका होऊ लागल्यावर भाजपचे भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी याबाबत लक्ष घालून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना, टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी टोल प्रशासनाचा निषेध करणारा फलक घेऊन थेट टोलनाका गाठला. भररस्त्यातच बैठक मारून आधी खड्डे बुजवानंतर टोल वसुल करा, असा फलक लावून निषेध व्यक्त केला आहे.

त्यांच्या या तातडीच्या आंदोलनाने पोलिसांची तसेच टोल प्रशासनाची धावपळ झाली. जीवन कोंडे यांच्यासमवेत भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड, विद्यार्थी आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश शहाजी कोंडे, युवामोर्चाचे उपाध्यक्ष अभिजित कोंडे, सहकार आघाडीचे भोर तालुकाध्यक्ष नीलेश बाळासाहेब कोंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टोलचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी त्यांची भेट घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही करत खड्डे बुजविण्यात येतील, तसेच येणाऱ्या शनिवार, रविवारच्या सुट्टीमधील वाहतुकीच्या गर्दीनंतर या ठिकाणी पक्का रस्ता करण्यात येईल, असे आश्वासन दिले.