Navale Bridge Tendernama
पुणे

Pune: ठिकाण तेच, तसाच अपघात, तेवढीच कोंडी अन् अश्वासने विरली हवेत

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुंबई-बंगळूर महामार्गावर नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ भूमकर पुलावर २४ हजार लिटर खोबरेल तेलाने भरलेला टँकर उलटला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. परंतु महामार्गावर तेल सांडल्याने सुमारे २० ते २५ दुचाकीस्वार घसरून पडले. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक जुन्या कात्रज बोगद्यातून वळविण्यात आली.

अजयकुमार यादव (वय २४, प्रतापगड, उत्तर प्रदेश, सध्या रा. पनवेल) असे टँकरचालकाचे नाव आहे. ते कोईमत्तूर (तामिळनाडू ) येथून २४ हजार लिटर खोबरेल तेल घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. नऱ्हे येथील भूमकर पुलावर गिअर बॉक्स निकामी झाल्याने त्यांचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने तो उलटला. नंतर दोन क्रेनच्या साह्याने टँकर मुख्य रस्त्यावरून उचलून बाजूला सेवा रस्त्यावर ठेवण्यात आला. यासाठी मोठी यातायात करावी लागली.

घटनास्थळी सिंहगड पोलिस, सिंहगड वाहतूक विभाग, तसेच महापालिका अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यावर माती टाकून रस्ता निर्धोक करण्याचे काम सुरू केले.