OLA, UBER Tendernama
पुणे

Pune RTO : आरटीओने Ola, Uber कंपन्यांना का पाठवल्या नोटीसा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यातील कॅब कंपन्यांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या दरांची अंमलबजावणी करीत नाहीत व केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार कॅब चालकांना ज्या सुविधा मिळणे अपेक्षित होत्या, त्यादेखील मिळत नाहीत. या कारणांचा आधार घेत पुणे आरटीओ (Pune RTO) कार्यालयाने ‘ओला’ (OLA) व ‘उबेर’ (UBER) या दोन कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत, तसेच ७ दिवसांच्या आत याबाबतचा लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहे. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारादेखील दिला आहे.

इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी कॅब कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ओला, उबेर कंपनीची तक्रार आरटीओ प्रशासनाकडे केली होती. त्याची दखल घेत आरटीओ कार्यालयाने दोन्ही कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत.

तक्रारीतील मुद्दे
- चालकांची कुठल्याही प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही
- कंपनीने कोणत्याही प्रकारचे रिफ्रेशर ट्रेनिंग चालकांना दिलेले नाही
- अपघात झाल्यास कंपनीशी संपर्क साधण्यास कोणतीही यंत्रणा नाही

कॅब चालकांचा संप मागे
नवीन दरवाढीच्या अंमलबजावणीसाठी इंडियन गिग वर्कर्स फ्रंटच्या वतीने २० फेब्रुवारीपासून संपाचा इशारा देण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी २१ फेब्रुवारी रोजी कॅब चालकांच्या प्रश्नांबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच आरटीओने देखील कॅब कंपनीला नोटीस दिल्याने नियोजित संप मागे घेत असल्याचे इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले आहे. बैठकीनंतर संपाबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

इंडियन गिग वर्कर्स फ्रंटची कॅब कंपनीबाबत तक्रार प्राप्त झाली असून, त्यानुसार नोटिसा देण्यात आल्या आहेत. यात लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रभारी, पुणे