RTO Tendernama
पुणे

Pune RTO News : आरटीओच्या 'त्या' निर्णयामुळे पुण्यातील अपघात कमी होणार का?

टेंडरनामा ब्युरो

Pune RTO News पुणे : कल्याणीनगरच्या अपघातानंतर पुणे आरटीओ प्रशासनाने अल्पवयीन मुलांच्या हाती कोणतेही वाहन येऊ नये, या करिता विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील विविध शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस तसेच शाळा, महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांचे विशेषतः अल्पवयीन मुलांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे.

कल्याणीनगरच्या अपघातानंतर आरटीओ प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली; मात्र प्रमाण कमी आहे. ‘आरटीओ’च्या कारवाईत १८ वर्षांखालील तीन मुले आढळून आले. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना रस्ते वाहतुकीचे नियम समजावून सांगणार आहेत.

१८ वर्षांखालील मुलांनी वाहन चालविणे कायद्याने गुन्हा असून त्याचा दंड पालकांना होणार आहे. ही बाब सांगून मुलांना वाहन चालविण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न आरटीओ प्रशासन करणार आहे. यासाठी आरटीओ कार्यालयातही बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी ‘आरटीओ’ने कडक पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे.

‘आरटीओ’ने २२ मेपासून शहरातील विविध भागांत कारवाई सुरू केली आहे. यात मद्यप्राशन करून वाहन चालविणे, विनानोंदणीचे वाहन चालविणे, तसेच १८ वर्षांखालील मुलांनी वाहन चालविणे आदींवर कारवाई सुरू आहे. मात्र दरम्यानच्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने कारवाईला खीळ बसली. आता पुण्याचे नवे आरटीओ अर्चना गायकवाड यांनी कारवाईत सातत्य राहील, अशी ग्वाही दिली आहे.

अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. अशांवर कारवाई केली जाईल. शिवाय त्यांचे प्रबोधन करण्यावरही भर राहणार आहे. मोटार वाहन निरीक्षक शाळा, महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे