Tender Tendernama
पुणे

Pune : 'त्या' कंत्राटदारांने केलेली शुल्कवाढ मागे घ्या! कोणी केली मागणी?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : येरवडा उपविभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या वार्षिक शुल्कात तब्बल ४०० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे पोहण्याचा नियमित व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या पूर्व भागातील जलतरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

येरवड्यात राज्य सरकारच्या क्रीडा संकुलात ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव आहे. येथे पुण्याच्या पूर्व भागातील अनेक जलतरणप्रेमी नियमित पोहण्यासाठी आणि खेळाडू सरावासाठी येतात. विशेष म्हणजे त्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. या दरवाढीला विभागीय क्रीडा संकुल समितीने मान्यता दिली आहे. जलतरण तलाव चालवण्याची जबाबदारी ज्या संस्थेने घेतली आहे त्या संस्थेला काम परवडेल या हेतूने दरवाढ केल्याचे अधिकारी सांगत आहेत.

अधिकाऱ्याचा दावा

- या अगोदर जलतरण तलाव चालवणाऱ्या संस्थेने २८ लाख रुपये भरून टेंडर घेतले होते

- यावेळी तीन वर्षांसाठी करार केलेल्या चॅम्पियन पूल या संस्थेने ३८ लाख रुपये भरून काम घेतले आहे

- तलावाचे कामकाज पाहणाऱ्या संस्थेला देखभाल आणि वीजबिल यासाठी मोठा खर्च येतो

- हा विचार करून क्रीडा संकुल समितीने दरवाढीला मान्यता दिल्याचे अधिकारी सांगतात

- मात्र यावर्षी करण्यात आलेल्या १३ हजार ते १५ हजार रुपये इतक्या वार्षिक शुल्कवाढीमुळे नाराजी

- ही शुल्कवाढ अन्यायकारक असल्याचे क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन

पाण्याच्या मोठ्या पंपांचे वीजबिल जास्त येते. ठेकेदाराला जर परवडले नाही तर कोणीही हा जलतरण तलाव चालवण्यासाठी पुढे येत नाही. वार्षिक शुल्काचा विचार केला तर रोज ३६ रुपये मोजावे लागतात. हा दर इतर ठिकाणच्या तुलनेत योग्य आहे. मागणीनुसार काहींना वार्षिक शुल्कामध्ये दोन ते तीन हजारांची सवलत दिली आहे.

- युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी

मागच्या वर्षी साडेचार हजार रुपये घेत होते. ते त्यांनी ५००० घ्यावेत. परंतु अचानक तेरा हजार ते पंधरा हजार इतके शुल्क करणे हे अन्यायकारक असून ही दरवाढ मागे घ्यावी.

- चैतन्य ढमढेरे, जलतरण प्रेमी

आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिक जलतरणासाठी येथे येतो. एवढे शुल्क देणे ज्येष्ठ नागरिकांना शक्य नाही. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यावर आणि औषधांवर अगोदरच मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे ही शुल्कवाढ त्वरित मागे घेण्याचे आदेश द्यावेत.

- घनश्याम अगरवाल, ज्येष्ठ नागरिक

मागील वर्षी (वार्षिक शुल्क)

३,५०० ते ४,५००

या वर्षी (वार्षिक शुल्क)

१३ हजार ते १५ हजार रुपये