School Students Tendernama
पुणे

Pune : गरीब शालेय विद्यार्थ्यांसाठी 'श्रीमंत' महापालिकेला वेळेच नाही?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प (PMC Budget) साडेनऊ हजार कोटींचा आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या टेंडर काढण्यासाठी अधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे. पण या श्रीमंत महापालिकेच्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना कोणी वाली आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरीही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. हे विद्यार्थी जुना गणवेश, फाटलेले दप्तर, अपुऱ्या वह्या घेऊन शाळेत येत आहेत.

महापालिकेमध्ये पूर्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यासाठी टेंडर काढली जात होती. पण शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे यात भ्रष्टाचार होत होता. त्यामुळे त्यावरून राजकारण होऊन एक तर टेंडर रद्द होत किंवा विद्यार्थ्यांना कमी दर्जाचे साहित्य पुरविले जात होते. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने २०१७ पासून गणवेश, स्वेटर, बूट, स्वेटर, दप्तर, वही, पेन्सील, पेन यासह इतर शैक्षणिक साहित्याचे पैसे थेट विद्यार्थी किंवा पालकांच्या बँक खात्यात (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर-डीबीटी) जमा केले जातात. पण तरीही प्रशासकीय कामाला गती आलेली नाही.

यंदा महापालिकेच्या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत ९३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या इयत्तेच्या गरजेनुसार दोन हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत ‘डीबीटी’ केली जाणार आहे. यासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ४८ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

भांडार अन् शिक्षण विभागाकडून विलंब

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी रक्कम ‘डीबीटी’ करताना भांडार विभागाकडून बाजारातून वस्तूंचे दर मागविले जातात. त्यामध्ये जो ठेकेदार कमी दरात वस्तू देण्यास तयार होतो, ती रक्कम निश्‍चित करून त्यानुसार विद्यार्थ्यांना वस्तूनिहाय पैसे जमा केले जातात.

दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू होते, त्याच दरम्यान ही प्रक्रिया सुरू करून जुलै महिन्याच्या सुरवातीलाच दर निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. पण प्रशासनात समन्वय नसल्याने याकडे दुर्लक्ष होते. यंदा भांडार विभागाला दर निश्‍चित करण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडला आहे. तसेच महापालिकेच्या इयत्ता पहिली वगळता उर्वरित सर्व इयत्तांमध्ये बहुतांश विद्यार्थी तेच असतात. तरीही त्यांच्या बँक खात्यांची माहिती अद्ययावत करण्यास शिक्षण विभागाकडून विलंब होत आहे.

शाळेसाठी वही, दप्तर, गणवेश असे साहित्य घेण्यासाठी महापालिकेकडून पैसे जमा होतात, पण अजून पैसे जमा झाले नाहीत. आम्हाला जेवढे जमले तेवढे साहित्य घेऊन दिले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर एका महिन्याच्या आत पैसे दिले तर आम्हाला दिलासा मिळेल.

- आशा शिंदे, पालक, सिंहगड रस्ता

शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यांची माहिती अद्ययावत करण्यात आलेली आहे. भांडार विभागाने नुकतेच प्रत्येक वस्तूचे दर निश्‍चित केलेले आहेत. त्यामुळे पुढच्या तीन-चार दिवसांत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरवात होईल.

- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

आकडे बोलतात

महापालिकेच्या शाळांची संख्या - २८४

विद्यार्थी संख्या - ९३ हजार

डीबीटीसाठी तरतूद - ४८ कोटी

विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम - २ हजार ते ५ हजार