Pune Tendernama
पुणे

Pune Rain News : 1 कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून! दोषी कोण...कंत्राटदार की पाऊस?

टेंडरनामा ब्युरो

Pune Rain News पुणे : ठिकाण आंबेगावमधील दळवीनगर. पुणे महापालिकेतील समाविष्ट झालेल्या ३४ गावांपैकी एक गाव. दत्तनगर चौकाकडून आंबेगावकडे जाताना मल्हार सोसायटी ते दळवीनगरदरम्यान नव्याने हस्तांतर केलेल्या रस्त्यासाठी एक कोटी रुपये खर्च करण्यात आले.

रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक आठवडा उलटला आणि शनिवारी झालेल्या पावसानंतर हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. खडी बाहेर आली असून रस्त्याला खाचखळग्यांचे स्वरूप आले आहे. इतकेच नव्हे, तर हा रस्ता ठिकठिकाणी खचला आहे.

शहरातील रस्त्यांची दुरुस्ती असो किंवा नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिका प्रशासनाने पुणेकरांच्या करातून आलेल्या कोट्यवधी रुपयांमधून कामे केली. पण, पहिल्याच जोरदार पावसानंतर शहरातील बहुतांश भागांतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. रस्त्यांवरील खडी बाहेर आली आहे, खाचखळगी तयार झाली अन् त्यामध्ये पाण्याची डबकी तयार झाल्याचे चित्र रविवारी शहरात दिसत होते.

महापालिकेने पावसाळ्यापूर्वी एप्रिल व मे महिन्यात रस्त्यांची दुरुस्ती केली होती. रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजविले होते तर काही ठिकाणी नवीन रस्ते तयार केले. परंतु, पहिल्याच पावसात विविध कामांच्या दर्जाचे पितळ उघडे पडले.

येथील रस्त्यांना फटका
शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांसह कोथरूड, शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, मॉडेल कॉलनी, गणेशखिंड रस्ता, आंबेगाव बुद्रूक, हडपसर गावठाण, पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपूल, ससाणेनगर, रामटेकडी, काळेपडळ, महंमदवाडी, हांडेवाडी रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, मगरपट्टा रस्ता, माळवाडी, मांजरी बुद्रूक, साडेसतरानळी, हिंगणे, आनंदनगर, माणिक बाग, वडगाव, धायरी, खराडी, केशवनगर, वडगाव शेरी, विमाननगर, घोरपडी, कोंढवे-कोपरे यांसह शहराच्या वेगवेगळ्या भागांमधील रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे.