Railway Station Tendernama
पुणे

Pune : रेल्वेने उन्हाळ्यासाठी प्रवाशांना दिली आणखी एक गुड न्यूज

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रेल्वेच्या ‘जनरल’ प्रवाशांना उन्हाळ्यात प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून रेल्वे प्रशासन सर्व स्तरावर प्रयत्न करीत आहे. पाण्याची व्यवस्था केल्यावर रेल्वे प्रशासनाने आता अल्प दरात जेवणाची सोय उपलब्ध केली आहे.

जनरल डब्यासमोरच ‘आयआरसीटीसी’चा स्टॉल मांडून तिथे त्यांना अवघ्या २० रुपयांत जेवण दिले जात आहे. पुण्यासह मिरज, दौंड, साईनगर शिर्डी या स्थानकांवर अशा प्रकारचे जेवण उपलब्ध आहे.

रेल्वे बोर्डाने पहिल्यांदाच देशातील सर्व महत्त्वाच्या स्थानकावर ‘आयआरसीटीसी’च्या मदतीने कमी दरात जेवण उपलब्ध करून दिले आहे.

जनरल डब्यातून सामान्य प्रवासी प्रवास करतात. रेल्वेचा जनरल डबा हा सुरवातीला आणि शेवटी असतो. त्याप्रमाणे फलाट एकसह अन्य फलाटाच्या दोन्ही बाजूला स्टॉल मांडण्यात आले आहेत. स्थानकावर २४ तास ही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे गरजू प्रवाशांना याचा लाभ होत आहे.

हे आहेत खाद्यपदार्थ :

- पुरी (७) भाजी व लोणचे : २० रुपये

- लेमन राइस : ५० रुपये

- पाणी बॉटल (२०० मिली) : ३ रुपये

सामान्य प्रवाशांना कमी किमतीत खाद्यपदार्थ मिळावे यासाठी रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार पुणे विभागातील चार प्रमुख स्थानकावर ‘जनता खाना’ उपलब्ध केले आहे. उन्हाळा संपेपर्यंत ‘जनरल’च्या प्रवाशांना याचा लाभ घेता येईल.

- डॉ मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे