Indian Railway Tendernama
पुणे

Pune Railway Station: 'त्या' कंत्राटदाराला रेल्वेने का केला दंड?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे रेल्वे स्थानकांवर (Pune Railway Station) ‘पे अॅण्ड यूज’ चालकाला रेल्वे प्रशासनाने तब्बल तीस हजार रुपयांचा दंड लावला आहे. युरीनसाठी कोणतेही शुल्क नसताना संबंधित चालकाने प्रति प्रवाशांकडून दोन ते पाच रुपयांची आकारणी केली आहे. या संदर्भात प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त होताच वाणिज्य विभागाने कारवाई करीत ३० हजाराचा दंड केला आहे.

रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ‘पे अॅण्ड युज’मध्ये युरीनसाठी कोणतेही शुल्क आकाराचे नाही, असे आदेश या पूर्वीच दिले आहे. मात्र, अनेकदा याचे उल्लंघन करून ‘पे अॅण्ड युज’चे चालक प्रवाशांकडून पैसे उकळतात. तसेच स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी देखील अनेकदा प्रवाशाकडून जास्त पैशांची मागणी केली जाते. हे लक्षात घेऊन वाणिज्य विभागाने पाहणी करून ही कारवाई केली आहे.

प्रवाशांना लुटणाऱ्याची खैर नाही
गेल्या काही दिवसांपासून वाणिज्य विभाग प्रवाशांच्या सुविधांबाबत आक्रमक बनला आहे. पुणे स्थानकावर काही दिवसांपूर्वी अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली. त्या नंतर आता प्रशासनाने प्रवाशांचे आर्थिक नुकसान करणाऱ्यावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. स्थानकावरील पार्किंग चालक, असो वा ‘पे अॅण्ड युज’चा चालक, असो सारेच आता वाणिज्य विभागाच्या रडारवर आले आहे.

रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. प्रवाशांना ज्या सुविधा मोफत मिळणे अपेक्षित आहे. त्यावर शुल्क लावणे हे प्रवाशांची लूट तर आहेच, शिवाय बेकायदेशीर देखील आहे.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे.