Indian Railway
Indian Railway Tendernama
पुणे

Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मिळणार सुखद धक्का; लवकरच...

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : पुणे स्थानकावर (Pune Railway Station) प्रवाशांच्या सोयीसाठी चार लिफ्ट बसविण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची विशेषतः दिव्यांग व महिला प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

लिफ्ट बसविण्यासाठी जागेची निश्चिती झाली आहे. टेंडर प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. लवकरच प्रत्यक्षात लिफ्ट बसविण्याच्या कामाला सुरवात होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून रोज सुमारे १९० रेल्वे धावतात. यातून दिवसाला सुमारे दीड लाख प्रवाशांची वाहतूक होते. सहा फलाट असलेल्या पुणे स्थानकावर एकही लिफ्ट नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याने अनेकदा प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.

रेल्वे प्रशासन देखील मागील सहा ते आठ महिन्यांपासून लिफ्ट बसविण्याची तयारी केली होती. मात्र त्या कामाला अद्याप गती मिळालेली नव्हती. मात्र आता त्या कामाला गती येत आहे. त्यामुळे लवकरच स्थानकावर चार लिफ्ट बसविल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पुणे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सरकता जिना आहे. आता फलाट १, फलाट दोन व तीन, फलाट तीन व चार व फलाट सहा अशा मिळून चार लिफ्ट बसविल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला आदींची मोठी सोय होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर लिफ्ट बसवण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. आवश्यक असलेली टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच कामाला सुरवात होईल. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे