Pune Railway Station Tendernama
पुणे

Pune Railway Station News : पुणे रेल्वे स्थानकावर का कोलमडले रेल्वेचे नियोजन?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : पुणे रेल्वे प्रशासनाने (Pune Railway Station) उन्हाळी विशेष गाड्या म्हणून उदंड रेल्वे सुरू केल्या, मात्र त्याचा फटका आता अन्य प्रवाशांना बसू लागला आहे.

रेल्वेकडे अतिरिक्त डबे नसल्याने आझाद हिंद एक्स्प्रेस व झेलम एक्स्प्रेससाठी राखीव असलेली स्क्रॅच रेल्वे प्रशासनाने बंद केली. परिणामी आता आझाद हिंद एक्स्प्रेस व झेलम एक्स्प्रेस पुण्याहून सुटण्यासाठी व पुण्यात परतण्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त उशीर होत आहे. प्रवाशांचे हाल तर होतच आहेत शिवाय त्यांचे पुढील नियोजन देखील बदलत आहे. रेल्वेच्या या कारभारावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेस व झेलम एक्स्प्रेसला सातत्याने उशीर होत आहे. यापूर्वी देखील असाच उशीर झालेला. तेव्हा रेल्वे प्रशासनाने स्क्रॅच रेल्वे (राखीव) रेल्वे सुरू केली. तेव्हा या दोन रेल्वेला पुण्याहून सुटताना उशीर होत नव्हता. मात्र जम्मू तावी व हावडा येथून येताना मात्र प्रचंड उशीर होत आहे. आता रेल्वेकडे डबेच नाहीत.

परिणामी पुणे रेल्वे प्रशासनाने स्क्रॅच रेल्वे बंद केली. त्यामुळे पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांना देखील २४ तासांपेक्षा जास्त उशीर होत आहे. मागील १५ दिवसांत रेल्वेने या दोन्ही गाड्या वारंवार रीशेड्युल केल्या आहेत.

डोकेदुखी वाढली

आझाद हिंद एक्स्प्रेस व झेलम एक्स्प्रेसचे कंम्पोझिशन एकच असल्याने दोन्ही गाड्यांसाठी सारखाच रेक वापरला जातो. आझाद हिंद हावडाहून पुण्यात आल्यावर त्याच रेकला झेलम एक्स्प्रेस म्हणून जम्मू तावीला पाठविले जाते. हीच पद्धत आझाद हिंद एक्स्प्रेससाठी वापरली जाते. दोन्ही पैकी एका रेकला देखील मार्गात उशीर झाल्यास त्याचा परिणाम दुसऱ्या गाडीच्या वेळेवर होत आहे. परिणामी दोन्ही रेल्वेला तब्बल २४ तासांपेक्षा जास्त उशीर होत आहे.

काय आहे रेल्वेचे म्हणणे

-दिल्ली ते जम्मू तावी दरम्यान आंदोलन सुरू असल्याने अनेक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बद्दल केला आहे. त्याचा फटका झेलम एक्स्प्रेसला बसत आहे. मार्ग बदलल्याने झेलम एक्स्प्रेसला जाता-येता उशीर होत आहे.

- हावडाच्या जवळ रुळांची कामे सुरू असल्याने ब्लॉक घेण्यात येत आहे. परिणामी आझाद हिंद एक्स्प्रेसला उशीर होत आहे.

- गाडी पुण्याला आल्यावर डब्यांची देखभाल, दुरुस्ती केली जाते. डबे धुतले जातात.

- डब्यांत बिघाड असेल तर तो डबा काढून, दुसरा डबा जोडण्यासाठी करावे लागणारे शंटिंगमुळे देखील उशीर होत आहे.

रेल्वेचे नियोजन पुरते कोलमडले आहे. त्याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास प्रवाशांना आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. रेल्वे प्रवाशाने प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नये.

- पियुष संगापूरकर, रेल्वे अभ्यासक