Pune Railway Station Tendernama
पुणे

पुणे रेल्वे स्थानक : 'या' कारणामुळे दररोज हजारो प्रवाशांना मनस्ताप

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे रेल्वे स्थानकावरून (Pune Railway Station) धावणाऱ्या सुमारे ७० गाड्यांना वेळेवर फलाट (Platform) उपलब्ध होत नसल्याने होम सिग्नलवर दहा ते पंधरा मिनिटे थांबावे लागत आहे. सेक्शनमध्ये वेळेवर धावणाऱ्या गाड्यांनादेखील फलाट न मिळाल्याने स्थानकाच्या दोन्ही होम सिग्नलला थांबावे लागत आहे. जेव्हा फलाट उपलब्ध होतात तेव्हाच गाड्यांना प्रवेश दिला जातो. रोज घडणाऱ्या या गोष्टीमुळे प्रवासी अक्षरशः वैतागले आहेत. यात ‘एलएचबी’ रेक असलेल्या गाड्यांचा अधिक समावेश आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून रोज सुमारे अडीचशे गाड्या धावतात. यातून सुमारे दीड लाख प्रवाशांची वाहतूक होते. मात्र यातील ७० गाड्यांच्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानकाच्या दोन्ही होम सिग्नलवर हे घडते. बरेचदा स्थानक अवघ्या एका मिनिटाच्या अंतरावर असताना प्रवाशांना किमान पंधरा मिनिटे थांबावे लागते.

पुणे स्थानकावरून सुटताना कधी प्रवासी तर कधी विक्रेत्यांकडून चेन ओढून गाडी थांबवली जाते. चेन ओढल्यावर गाडी पुन्हा धावण्यासाठी किमान १० ते १२ मिनिटांचा वेळ लागतो. जर गाडी फलाट एक व तीनवरून निघत असताना चेन ओढली आणि रेल्वे क्रॉसओव्हरवर उभी असेल तर एकाचवेळी सर्व फलाट ब्लॉक होतात. त्याचादेखील मोठा परिणाम वाहतुकीवर होतो. पुणे स्थानकावर रोज किमान चार गाड्यांच्या बाबतीत हे घडते.

गेल्या अनेक दिवसांपासूनची ही समस्या आहे. रेल्वे प्रशासनाने तत्काळ यार्ड रिमोल्डिंगचे काम सुरू करावे. फलाट नसल्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो.
- निखिल काची, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती, पुणे

फलाट वेळेवर उपलब्ध होत नसल्याने काही गाड्यांना थांबावे लागते हे खरे आहे. मात्र त्यासाठीच यार्ड रिमोल्डिंगची कामे केली जात आहेत. यामुळे फलाटांची लांबी वाढेल. परिणामी, गाड्यांना होम सिग्नलवर थांबावे लागणार नाही.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे