Pothole Tendernama
पुणे

Pune : पुणेकर खड्ड्यांनी हैराण; पालिकेला मात्र कारवाईचा विसर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे (Potholes) मुदतीत न बुजविल्यास कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई करणार, असे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र ९ ऑगस्टची मुदत उलटूनही खड्डे मात्र जशास तसेच आहेत. या प्रकरणी केवळ एका कनिष्ठ अभियंत्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने खड्डे बुजविण्याच्या कामाला गती येणे आवश्‍यक होते. मात्र या काळात येरवडा येथील हॉटमिक्स प्लांट बंद पडल्याने चार दिवस खड्डे बुजविण्याचे काम ठप्प झाले.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवरील खड्डे ९ ऑगस्टपर्यंत बुजविण्याचा आदेश दिला होता. या मुदतीत खड्डे बुजविले नाही, तर संबंधित कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिली होता.

ही मुदत उलटून गेल्यानंतरही प्रमुख १५ रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे तसेच आहेत. शिवाय पसरलेली खडी, खचलेले चेंबर यामुळे रस्ते धोकादायक झालेले आहेत.

सातारा रस्त्यावर खड्डा पडल्याने नोटीस
महापालिकेने निवड केलेल्या प्रमुख १५ रस्त्यांमध्ये सातारा रस्त्याचा समावेश आहे. पद्मावती येथे खड्डा पडल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित कनिष्ठ अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

सातारा रस्त्यावर पद्मावती येथे पडलेला खड्डा बुजविला नसल्याने कनिष्ठ अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यावर खुलासा आल्यानंतर पगारवाढ रोखणे, बढती रोखणे यासह इतर पद्धतीने कारवाई केली जाईल. शहरातील इतर रस्त्यांवरही खड्डे पडलेले आहेत, या प्रकरणी नोटीस बजावली जाईल.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका