Pune Tendernama
पुणे

Pune: PMPने प्रवास करणाऱ्या पुणेकरांची छत्री कायम राहणार, कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बसथांब्यासाठी ‘पीएमपी’ची (PMPML) मागील चार वर्षांपासून सुरू असलेली भटकंती आता संपली आहे. बस थांब्याच्या आठव्या टेंडरला प्रतिसाद मिळाला असून, सिद्धी एडीव्हीटी यांना बसथांब्याचा ठेका (Contractor) मिळाला आहे. जुलै महिन्यांपासून याचे काम सुरू होईल. मात्र, ३०० बसथांबे उभे करण्यासाठी किमान ३०० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना पावसाळ्यात बसथांब्यावर छत्री घेऊनच उभे राहावे लागणार आहे.

स्टेनलेस स्टीलचा बस थांब्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाने आतापर्यंत सात वेळा टेंडर प्रसिद्ध केली होती. मात्र, त्यातील अटीमुळे जाहिरदाराचा त्याला शून्य प्रतिसाद लाभत होता. आठव्या वेळेस मात्र ‘पीएमपी’ प्रशासनाने आपल्या अटीत बदल केला. त्याला तीन जाहिरातदारांचा प्रतिसाद लाभला. तिघांमध्ये सिद्धी या कंपनीच्या जाहिरातदारास बसथांब्यांचा मक्ता मिळाला.

जुलैपासून ‘पीएमपी’ प्रशासनाने त्यांना काम सुरू करण्यास सांगितले आहे. सुधारित नियमांत काम सुरू झाल्याच्या पहिल्या ९० दिवसांत ५० बस थांबे बांधण्यास सांगितले आहे. त्यानंतरच्या प्रत्येक ४५ दिवसांत ५० बस थांबे उभे करण्याची मुदत आहे. ३०० बस थांब्यासाठी ३०० दिवसांचा अवधी दिला आहे.

‘पीएमपी’ने काय बदल केला?

- पीएमपी प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी बीओटी तत्त्वावर स्टेनलेस स्टीलचा बसथांबा बांधत आहे.

- स्टेनलेस स्टीलचा एक बसथांबा बांधण्यासाठी सुमारे चार लाख रुपयांचा खर्च येतो.

- जाहिरातदारांनी बसथांबा बांधल्यावर पूर्वी त्याची मालकी दहा वर्षांनी ‘पीएमपी’कडे येत होती. याला जाहिरातदारांनी विरोध केला.

- आता नव्या बदलात १५ वर्षानंतर ‘पीएमपी’कडे त्याची मालकी येणार आहे. म्हणजे बस थांबा बांधल्यावर पहिली १५ वर्षे त्याची मालकी जाहिरातदारांची असेल.

- बसथांब्यातून ‘पीएमपी’ला मिळणाऱ्या उत्पन्नात दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ द्यावी अट पीएमपीची होती. यालाही विरोध झाल्याने आता वार्षिक दरवाढ १० टक्क्यांऐवजी ६ टक्के करण्यात आला.

- या दोन अटींमध्ये बदल केल्याने जाहिरातदारांचा चांगला प्रतिसाद लाभला.

यंदाच्या वर्षी देखील हाती छत्री

‘पीएमपी’ ३०० बसथांबे बीओटी तत्त्वावर उभारत आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जुलैपासून जाहिरातदार ठरवून दिलेल्या जागेवर स्टेनलेसस्टीलचा बसथांबा उभा करण्याचे काम सुरु करेल. पहिल्या ४५ दिवसांत बसथांब्याचे आरेखन, महापालिकेची वा अन्य संस्थेचा ना हरकत प्रमाणपत्र घेणे आदी कामे करणे. ४५ दिवस ते ९० दिवसांत पहिले ५० बसथांबे बांधले जातील.

या कालावधीत जर थांबे उभारले गेले नाहीतर संबंधित जाहिरातदारास दंड केला जाईल. ९० दिवसांपासून ते पुढील ४५ दिवसापर्यंत म्हणजे एकूण १३५ दिवसांत पुढील ५० बस थांबे बांधणे अपेक्षित आहे. असे हे काम ३०० दिवस चालेल. पहिले ५० बस थांब्याच्या प्रतीक्षेतच पावसाळा संपेल. त्यामुळे प्रवाशांना हाती छत्री घ्यावीच लागेल.

‘पीएमपी’ दृष्टीक्षेपात

- एकूण बस संख्या : १६५०

- प्रवासी संख्या : सुमारे १२ लाख

- एकूण बस थांबे : ९०००

- शेड असलेले थांबे : १२००

- बीआरटी मार्गावर थांबे : १२०

- एक आच्छादीत थांब्याचा खर्च : सुमारे ४ लाख

बसथांब्याच्या नियम व अटींमध्ये आवश्यक तो बदल केला आहे. त्यामुळे जाहिरातदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रवाशांना चांगल्या दर्जाचे बस थांबे उपलब्ध होत असल्याने त्यांची सोय होणार आहे.

- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक (व्यावसायिक), पीएमपीएमएल, पुणे