Pune City Tendernama
पुणे

Pune : वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी पुणेकरांची मेट्रोला पसंती; एकाच दिवसात...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी रविवारी (ता. १५) लाखो पुणेकर मेट्रोने प्रवास करून शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेश मंडळाचा देखावा पाहण्यासाठी दाखल झाले. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

रविवारी रात्री आठपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार वनाज ते रामवाडी मार्गावर एक लाख दोन हजार ८९२, तर पिंपरी चिंचवड ते जिल्हा न्यायालय मार्गावर ७० हजार ६४ प्रवाशांनी प्रवास केला. रविवारी दोन्ही मार्ग मिळून एक लाख ७२ हजार ९५६ प्रवाशांनी प्रवास केला. शनिवारी दोन्ही मार्गावर मिळून दोन लाख ४३ हजार ४३५ प्रवाशांनी प्रवास केला. यातून २९ लाख ७३ हजार १३३ रुपयांचे उत्पन्न मेट्रोला प्राप्त झाले.

शहराच्या मध्य भागातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी शनिवारपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली. रविवारी सुट्टी असल्याने शहराच्या विविध भागातून नागरिक मध्यभागात दाखल झाले.

शहरातील ज्या भागात मेट्रोची स्थानके आहेत, त्या भागातील प्रवाशांनी मेट्रोचा पर्याय निवडला. यात कोथरूड, पिंपरी-चिंचवड, रामवाडी, आदी भागांतून नागरिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले. मेट्रोच्या स्थानकासह मेट्रोत प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. मेट्रोची सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती.

विसर्जनाच्यादिवशी मेट्रोची ४० तास धाव...

अनंत चतुर्दशीच्यादिवशी मंगळवारी (ता. १७) सकाळी सहा ते बुधवारी (ता. १८) सकाळी सहा वाजेपर्यंत असे एकूण २४ तास मेट्रोची सेवा अखंड सुरू राहणार आहे. बुधवारी सकाळी सहा ते रात्री दहा अशी नियमित सेवा सुरू राहणार आहे. अनंत चतुर्दशी आणि दुसऱ्या दिवसाचा विचार केला, तर दोन दिवसात मेट्रोची अखंड चाळीस तास सेवा सुरू असेल. मेट्रोच्या या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले.

प्रवाशांच्या गर्दीने स्थानके फुलली...

रविवारी सर्वाधिक गर्दी पिंपरी चिंचवड स्थानक आणि पुणे महापालिका स्थानकावर होती. याशिवाय शिवाजीनगर न्यायालय, डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान आदी स्थानकदेखील प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली होती.