pune tendernama
पुणे

Pune : 'त्या' कारवाईनंतर पुणे महापालिकेला जाग; अवैध बांधकामांना दिलेल्या नोटिसांची होणार चौकशी

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील अवैध इमारतींना कारवाईची नोटीस द्यायची, पण त्यानंतर कारवाई न करता प्रकरण दाबून टाकायचे. नागरिकांनी सदनिका विकत घेतल्या, बिल्डरचे खिसे भरले की मग कारवाई करायची, असे प्रकार होत आहेत. अशा ‘अर्थपूर्ण’ नोटिसा आता रडारवर येणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून नोटीस देऊनही कारवाई न केलेल्या प्रकरणांचा अहवाल आयुक्त विक्रम कुमार यांनी मागविला असून, यासाठी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची चौकशी समिती गठित केली आहे.

गेल्या आठवड्यात पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने आंबेगाव येथील ११ अवैध इमारतींवर बुलडोझर चढविला. तब्बल ५०० सदनिकांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने ही मोठी कारवाई केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम सुरू असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेव्हाच कारवाई का केली नाही? असा प्रश्‍न उपस्थित झाल्याने बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात गंभीर आरोप करणारे पत्र माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आयुक्तांना दिले असून, चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आंबेगाव प्रमाणे नऱ्हे, धायरी, किरकटवाडी, लोहगाव, शिवणे, खडकवासला, येवलेवाडी यासह इतर भागांत मोठ्या प्रमाणात अवैध इमारतींचे बांधकामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी इमारती पूर्ण झाल्या असून, ग्राहकांच्या अज्ञानाचा व परिस्थितीचा फायदा घेऊन हे बिल्डर अवघ्या १० ते १५ लाखात सदनिका विकत आहेत. अशा बांधकामांना महापालिकेतर्फे कारवाईची नोटीस दिली जाते, पण कारवाई केली जात नसल्यानेच नागरिकांची फसवणूक होत आहे. महापालिकेने वेळीच कारवाई केली तर अवैध बांधकाम करणाऱ्यांवर जरब बसू शकते.

महापालिकेत सुरू असलेल्या या प्रकाराबाबत आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी (ता. २) बैठक घेतली. यामध्ये शहरातील कोणत्या कनिष्ठ अभियंत्याच्या हद्दीमध्ये किती अवैध बांधकामांना नोटीस दिली आहे? कधी दिली आहे? त्यावर काय कारवाई करण्यात आली? कारवाई न झाल्यास त्याचे कारण काय? याचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्त बिनवडे व शहर अभियंता वाघमारे यांची समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई होणार आहे.

लेखी खुलासा मागविला

आंबेगाव येथे अवैध ५०० सदनिकांवर कारवाई करण्यात आली आहे. या इमारतींना २०२१ मध्ये नोटीस बजावण्यात आली होती, त्यानंतरही तेथे बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. तेथे कारवाई का झाली नाही? यावर संबंधित अभियंत्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

आंबेगाव येथे अनधिकृत इमारतींवर वेळीच कारवाई न केल्याने कनिष्ठ अभियंत्याकडून लेखी खुलासा मागविला आहे. तसेच संबंधित बिल्डरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पुणे शहरात अवैध बांधकाम होत असताना त्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे, ती का होत नाही याची चौकशी करण्यासाठी समिती गठित केली आहे. याची पुढची बैठक १२ जानेवारी रोजी होईल.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका