Ajit Pawar Tendernama
पुणे

Pune : अजितदादांनी सुनावल्यानंतर पुणे महापालिकेला आली जाग!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृह लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे, यासाठी उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच, शहरातील अन्य नाट्यगृहांमधील प्रलंबित कामे व रखडलेल्या नाट्यगृहांची कामेही लवकरच मार्गी लावावीत, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतेच दिले.

महापालिकेच्या नाट्यृहांबाबतच्या समस्या, आवश्यक सुविधा आदींचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी ही बैठक घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त केली होती. सर्वच नाट्यगृहांतील स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. या बैठकीला सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ, प्रशासन अधिकारी राजेश कामठे, भवन विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख उपस्थित होते.

या वेळी आयुक्त डॉ. भोसले यांनी महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे उद्‍घाटन झाले असले, तरी हे नाट्यगृह कार्यान्वित होण्यासाठी नाट्यगृहाच्या भाड्याचे दर निश्‍चित करणे बाकी आहे. त्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना आयुक्तांनी सांस्कृतिक विभागाला दिली. तसेच, नाट्यगृहातील उपाहारगृह, हाऊसकीपिंग आदींसाठीचे टेंडरही तातडीने काढावीत, असे आदेश त्यांनी दिले.

नव्या नाट्यगृहांच्या कामाचा आढावा

महापालिकेकडून कोथरूड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलामंदिर आणि सिंहगड रस्त्यावर श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले सांस्कृतिक भवन व कलामंदिर बांधण्यात येत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या नाट्यगृहांचे काम रखडले आहे. आयुक्तांनी बैठकीत या कामांचाही आढावा घेतला.

‘‘नाट्यगृहांच्या उभारणीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत असतो. त्याची कामे वर्षानुवर्षे रखडणे गैर आहे. संबंधित विभागांना ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत,’’ असे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

नाट्यगृहाला प्रतिसाद मिळणार का?

शहरात महापालिकेच्या मालकीची १४ नाट्यगृहे आहेत. मात्र, यातील बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, गणेश कला क्रीडा मंच आणि अण्णाभाऊ साठे नाट्यगृह ही नाट्यगृहे वगळता अन्य ठिकाणांना अतिशय अल्प प्रतिसाद आहे. कार्यक्रम नाही म्हणून प्रेक्षक नाही आणि प्रेक्षक नाहीत म्हणून कार्यक्रम नाहीत, अशा कोंडीत ही नाट्यगृहे सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर हडपसर येथील नव्या नाट्यगृहाला कलाकार आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी महापालिकेला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.