PMC Tendernama
पुणे

Pune : पीएमसी प्रशासनाचा अजब कारभार; काम करण्याआधीच बिल उचलून ठेकेदार पसार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गुलटेकडी येथील डायस प्लॉट ते गिरिधर भवन दरम्यानच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुलाखाली फ्लोव्हर बेडची नासाडी होऊ नये, म्हणून फेन्सिंग जाळी लावणे आणि फ्लोव्हर बेड विद्युतविषयक दुरुस्ती करण्याच्या कामासाठी महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, फ्लोव्हर बेड लावणे व विद्युतविषयक दुरुस्ती करण्याचे काम करण्याच्या आधीच फेन्सिंग जाळी बसवून त्याचे बिल उचलण्याचा अजब प्रकार ठेकेदार आणि प्रशासनाने केल्याचे समोर आले आहे.

संबंधित जाळ्यांसाठी ३२ लाख रुपयांचा खर्च आला असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. तसेच, उर्वरित रक्कम उद्यान विभागामार्फत खर्च करून कामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, १०० मीटर पेक्षाही कमी अंतराची फेन्सिंग जाळी बसविण्यासाठी एवढा खर्च कसा येतो? त्यात फ्लोव्हर बेड लावणे व विद्युतविषयक कामच झालेले नसेल आणि ते होणार नसेल, तर या फेन्सिंग जाळ्यांचा उपयोग काय? मोकळ्या जागेला फेन्सिंग केले आहे का? नागरिकांच्या कररूपी पैशांच्या अपव्यय कशासाठी केला? असे प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित केले जात आहेत.

याबाबत, मुख्य उद्यान निरिक्षक अशोक घोरपडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे काम प्रकल्प विभागाचे असून, उद्यान विकसित करणेही त्यांच्या अखत्यारितच येत असल्याचे सांगितले. मात्र, प्रकल्प विभागाकडून हे काम विद्युत आणि उद्यान विभाग करणार आहे. प्रकल्प विभाग आता काहीही करणार नसल्याचे सांगण्यात आल्याने महापालिकेच्या दोन विभागांमध्येच समन्वय नसल्याचे दिसून येते.

फ्लोव्हर बेडचे काम उद्यान विभागामार्फत करण्यात येणार आहे. विद्युत विभागही लवकरच काम करणार आहे. पण, ही दोन्ही खाती काम कधी सुरू करणार आहेत, याबाबत कल्पना नाही.

- गौरी गवते, शाखा अभियंता, प्रकल्प विभाग

सरकारी पैशांची लूट होणे टाळण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करून पुढील १५ दिवसांत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. यात कोणत्या ‘माननीयां’चा हात आहे का? हे सुद्धा तपासून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा. आशा बऱ्याच चौकशा गुंडाळून ठेवण्यात येतात. पुढे काहीही होत नाही. आम्ही या गैरप्रकाराचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत. काही निर्णय लागला नाही तर महापालिकेबाहेर उपोषण करण्यात येईल.

- बाळासाहेब रुणवाल, स्थानिक नागरिक