पुणे (Pune) : काही महिन्यांपासून बंद असलेली पुणे-बेळगाव विमानसेवा (Pune - Belagavi Flight) आता पुन्हा सुरू होत आहे. यंदाच्या हिवाळी हंगामात पुण्याहून बेळगावसाठी दोन विमान कंपन्यांची सेवा सुरू होत आहे.
पुण्याहून काही मोजक्याच मार्गावर ‘उडान’ योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू झाली होती. गेल्यावर्षी प्रवाशाचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही तांत्रिक कारण पुढे करून पुणे-बेळगाव विमानसेवा बंद करण्यात आली. सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी पुण्यातील प्रवाशांनी केली. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही.
आता बेळगावमधून लोकप्रतिनिधी व प्रवाशांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ऑक्टोबरपासून पुण्याहून बेळगावसाठी दोन कंपन्यांची विमानसेवा सुरू करीत आहे. यात इंडिगो व स्टार एयरची सेवा असणार आहे.
स्टार एयरची सेवा दैनंदिन असेल, तर इंडिगोची सेवा आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार व शनिवारी असेल. स्टार एयरची सेवा २९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. बेळगावहून सायंकाळी पाच वाजून ४५ मिनिटांनी विमान झेपावेल, ते पुण्याला सहा वाजून ४५ मिनिटांनी पोचेल. पुण्याहून विमान सायंकाळी सात वाजून १० मिनिटांनी झेपावेल, ते बेळगावला रात्री आठ वाजून १० मिनिटांनी पोचेल. ही सेवा दररोज असणार आहे.
इंडिगोचे विमान बेळगावहून सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांनी झेपावेल, ते पुण्याला सायंकाळी सात वाजून ३० मिनिटांनी पोचेल. पुण्याहून विमान सायंकाळी सात वाजून ५५ मिनिटांनी झेपावेल, ते बेळगावला रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी पोचेल.
पुण्याहून बेळगावसाठी विमानसेवा सुरू होणे आनंदाची बाब आहे. या सेवेचा दोन्ही शहरांतील प्रवासी आणि उद्योजकांना फायदा होणार आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ