Mhalunge Mann TP Scheme Tendernama
पुणे

Pune : म्हाळुंगे-माणसह 5 टीपी स्कीमबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय; तब्बल 800 कोटींचा

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : म्हाळुंगे-माणसह पाच नगर रचना योजनांना (टीपी स्कीम) पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे आठशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याचे काम पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतले आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून, टेंडर (Tender) प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आराखड्याच्या माध्यमातून नगर रचना योजनांमधील लोकसंख्या विचारात घेऊन जलवाहिन्यांचे जाळे, पाण्याच्या टाक्या उभारणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आदी कामे केली जाणार आहेत. त्यासाठीचा सर्व खर्च ‘पीएमआरडी’करणार आहे.

‘पीएमआरडी’कडून हद्दीचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. म्हाळुंगे-माण हायटेक सिटी नगर रचना योजनेला यापूर्वी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापाठोपाठ होळकरवाडी येथे दोन, तर औताडे-हांडेवाडी आणि वडाची वाडी नगर रचना योजनेचे प्रारूप तयार करून यापूर्वी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारच्या स्तरावर अद्याप या नगर रचना योजनांना मान्यता मिळालेली नाही. त्यास मान्यता मिळेल, या भरवशावर प्राधिकरणाकडून या योजनांच्या हद्दीतील कामे टप्प्याने सुरू करण्यात आली आहे.

म्हाळुंगे-माणला वारज्यातून पाणी

म्हाळुंगे-माण येथील नगर रचना योजनेला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या वारज्यातील जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी उचलण्यात येणार आहे. या योजनेसाठी दररोज सुमारे चाळीस एमएलडी पाण्याची गरज लागणार आहे. ही गरज पुरविण्यासाठी वारजे ते म्हाळुंगे-माण अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. याशिवाय वितरण व्यवस्था करण्यासाठी सुमारे तीनशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाची वाडीसाठी पाचशे कोटी

होळकरवाडी येथील दोन नगर रचना योजनांसह औताडे-हांडेवाडी आणि वडाची वाडी येथील नगर रचना योजनेची भविष्यातील लोकसंख्या, त्यासाठी लागणारी पाण्याची गरज, अस्तित्वातील पाणी वितरण व्यवस्थेचा आढावा आणि नव्याने जाळे निर्माण करणे, आवश्‍यक तेथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आदी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे पाचशे दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

‘पीएमआरडी’करणार खर्च

या कामांसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया यापूर्वीच ‘पीएमआरडी’ने सुरू केली आहे. जवळपास पंधरा कंपन्यांनी या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. या सर्व कामांसाठीचा खर्च ‘पीएमआरडी’कडून केला जाणार आहे. मध्यंतरी ही गावे ‘पीएमआरडी’च्या हद्दीतून वगळून महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठ्याची व्यवस्था झाल्यानंतर ती महापालिकेकडे हस्तांतर केली जाणार असल्याचे ‘पीएमआरडी’कडून सांगण्यात आले.

म्हाळुंगे-माणसह होळकरवाडी येथील दोन आणि औताडे-हांडेवाडी व वडाची वाडी येथील नगर रचना योजनांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सुमारे आठशे कोटी रुपयांचा हा आराखडा आहे.

- अशोक भालकर, मुख्य अभियंता, अभियांत्रिकी विभाग, पीएमआरडीए

नगर रचना योजना आणि पाणीपुरवठ्यासाठी येणारा खर्च

- म्हाळुंगे- माण नगर रचना योजना-३०० कोटी रुपये

- होळकर वाडी नगर रचना योजना १ व २-२६० कोटी रुपये

- औताडे-हांडेवाडी व वडाची वाडी नगर रचना योजना-२५० कोटी रुपये