पुणे (Pune) : प्रवासी उत्पन्न वाढविण्यासाठी पीएमपी (PMP) आता नव्या प्रवाशांचा शोध घेणार आहे. प्रवासी संख्येत पाच लाखांची वाढ व्हावी हा उद्देश ठेवून ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) जोडण्याचे काम सुरू झाले आहे.
‘पीएमपी’च्या मार्गांचे व शेड्यूल गाड्यांचे पुनर्नियोजनाचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यात महाविद्यालय, बाजारपेठ, रुग्णालय, रेल्वे स्थानक आदी ठिकाणे जोडण्यावर भर दिला जाणार आहे. दोन महिन्यांत मार्गाचे पुनर्नियोजनाचे काम पूर्ण होईल. दररोजची प्रवासी संख्या १७ लाख इतकी व्हावी, असे ‘पीएमपी’ने उद्दिष्ट ठरविले आहे.
‘पीएमपी’चे उत्पन्न सध्या घटत आहे. हे उत्पन्न वाढविण्यासाठी वेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात असले, तरी त्यात ‘पीएमपी’ला यश मिळालेले नाही. आता नव्या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणांना ‘पीएमपी’ने जोडले जाणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत पर्यायाने उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास पीएमपी प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मार्गाचे पुनर्नियोजन असे...
नवीन मार्ग सुरू : २६
जुने मार्ग बंद : २३
जुने एकूण मार्ग : ३४८
सद्यःस्थितीतील एकूण मार्ग : ३६७
बसची संख्या (आधी) : १७९४
बसची संख्या (आता): १८१४
गर्दीच्या वेळी वापर
पूर्वी बस संख्या : २३२
आता बस संख्या : ३३४
बदल काय?
१. कमी प्रतिसादाच्या सकाळ व रात्रीच्या फेऱ्या रद्द.
२. पूर्वी १० मिनिटांची असलेली वारंवारता आता ३० मिनिटांची.
३. मार्गांचे विस्तारीकरण.
४. प्रवासी मिळण्याचे ठिकाण जोडण्यावर भर.
वेगळा विचार
- नेहमी प्रवासाचा शेवटच्या ठिकाणाचा विचार केला जातो. पीएमपी आता प्रवासाच्या सुरुवातीचा विचार करतेय
- पीएमपीची सेवा अधिक व्यापक होत असल्याने जास्त प्रवासी प्रवास करू शकतील
- मिसिंग लिंकमुळे नवे मार्ग तयार होणार
- पुण्यातील ‘पीएमपी’चे जाळे वाढणार
- पीएमपी प्रवाशांची दररोजची संख्या १७ लाख होण्याचा अंदाज
तोट्यात असणाऱ्या सकाळ व रात्रीच्या फेऱ्या कमी केल्या आहेत. जनरलमध्ये बसची संख्या वाढविणे, नव्या मार्गावरच्या प्रवाशांना सेवा देण्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी मार्गाचे व शेड्यूलचे पुनर्नियोजन करण्याचे काम सुरू आहे.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल