PMPML Tendernama
पुणे

PMPML प्रशासनाचा मोठा निर्णय; स्वमालकीच्या खरेदी करणार तब्बल एवढ्या बस

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : लवकरच प्रवाशांच्या सोयीसाठी ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्या २०० बस दाखल होणार आहेत. यातील १०० बस ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या ‘सीएनजी’वर धावणाऱ्या असतील, तर उर्वरित १०० बस भाडेतत्त्वावरच्या ईलेक्ट्रिक स्वरूपाच्या असणार आहेत. ‘सीएनजी’ बसच्या निविदा प्रक्रियेला या आठवड्यात सुरुवात होणार आहे, तर दोन आठवड्यांनंतर ईलेक्ट्रिक बसच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत बस खरेदीची प्रक्रिया पूर्ण होऊन २०० बस प्रवाशांच्या सेवेत धावतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.

‘पीएमपी’मध्ये बसची संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम प्रवासी सुविधेवर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने बसची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्वमालकीच्या १०० ‘सीएनजी’ बस घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार यांत्रिक विभागाकडून आता टेंडर प्रक्रिया राबविली जाणार आहे. या १२ मीटरच्या बस असतील. ‘सीएनजी’ बसची उपलब्ध होण्यास कोणतीही अडचण नसल्याने बस खरेदीची प्रक्रिया लवकर पार पडेल. त्यामुळे तीन ते चार महिन्यांत प्रत्यक्षात बस धावण्यास सुरुवात होईल.

ई-बसला वेळ लागण्याची शक्यता
भाडेतत्त्वावरच्या १०० ई-बस घेतल्या जाणार आहेत. त्याच्या निविदा प्रक्रियेला दोन आठवड्यांत सुरुवात होईल. मात्र ई-बसची उपलब्धता होण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मागच्या दीड वर्षापासून पीएमपी ई-बसच्या प्रतीक्षेत आहे.

१९ बस दाखल होणार
‘पीएमपी’च्या ताफ्यात सप्टेंबरमध्ये आणखी १९ ई-बस दाखल होणार आहेत. या बस मागच्या वर्षीच येणे अपेक्षित होते, मात्र बसची बॅटरी उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम बसच्या उत्पादनांवर झाला. अजूनही काही ई-बस ‘पीएमपी’ला मिळालेल्या नाहीत.

‘पीएमपी’च्या ताफ्यात २०० बस येणार आहेत. सीएनजी व ई-बसच्या टेंडर प्रक्रियेलादेखील लवकर सुरुवात होईल. २०० बस दाखल झाल्यावर प्रवासी सेवेचा विस्तार होईल. प्रवाशांना याचा लाभ होईल.
- सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी पुणे