पुणे (Pune) : पुणे शहर (Pune City), पिंपरी चिंचवड (PCMC) आणि जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पीएमपी (PMPML) पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० आच्छादित बस थांबे उभारणार आहे. त्यासाठीची टेंडर (Tender) प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे पीएमपी प्रशासनाने म्हटले आहे. हे काम अल्पावधीत सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे ऊन, वारा व पावसापासून संरक्षण होणार आहे.
आच्छादित बस थांब्यांअभावी प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल घेतली आहे. पीएमपीच्या सुमारे दोन हजार बसमधून दररोज ११ लाख प्रवाशांची ३७५ हून अधिक मार्गांवर वाहतूक होते. शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे पाच हजार बस थांबे आहेत. त्यातील ११३० थांबे आच्छादित आहेत.
आता ‘बांधा- वापरा- हस्तांतर करा’ (BOT) तत्त्वावर ३०० थांबे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदार खर्च करणार असून त्यावर त्याला जाहिरातही करता येईल. त्यासाठी पीएमपीने १५ वर्षांचा करार केला आहे. पहिल्या टप्प्यात ९० दिवसांत ५० थांबे उभारणार असून उर्वरित आठ ते दहा महिन्यांत पूर्ण होतील. गर्दीच्या मार्गांवरील थांबे उभारण्याचे काम प्राधान्याने हाती घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.