पुणे (Pune) : वाहतूक कोंडीवर (Traffic Jam) पर्याय काढण्यासाठी शहरातील रस्त्यांचे जाळे भक्कम करण्यावर या अर्थसंकल्पात (Pune Municipal Corporation Budget) भर देण्यात आला आहे. बालभारती ते पौड रस्ता, पीपीपी आणि क्रेडिट नोटच्या माध्यमातून नवीन १३ रस्ते विकास करणे, पुणे स्ट्रीट प्रोगाम अंतर्गत प्रमुख रस्त्यांची पुनर्रचना करणे आदी कामे पुढील आर्थिक वर्षात हाती घेण्यात येणार आहेत.
पथ विभागासाठी पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ९९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ७९६ कोटी रुपयांची तरतूद ही भांडवली कामांसाठी करण्यात आली आहे. त्यातून विकास आराखड्यातील विधी महाविद्यालयाला जोडणाऱ्या बालभारती ते पौड रस्ता या २.१० किलोमीटर लांबीच्या लिंक रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या कामासाठी २३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे विधी महाविद्यालय रस्ता, पौड रस्तावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. तर पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम अंतर्गत बिबवेवाडी रस्ता, भाऊ पाटील रस्ता बावधन, नगर आणि सोलापूर रस्ता सुरक्षित व पादचारी पूरक रस्त्यांची पुनर्रचना करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
तर खासगी सहभागातून म्हणजे क्रेडिट नोटच्या माधम्यातून खराडी भागातील आठ रस्ते, बाणेर भागातील तीन रस्ता, कोंढवा व मुंढवा येथील प्रत्येक एक रस्ता, असे एकूण १३ रस्ते, तसेच मुळा नदीवरील मुंढवा ते खराडी दरम्यान पूल, गंगाधाम चौकातील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल अशी काम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे बंडगार्डन ते मुंढवा असा साडेपाच किलोमीटर लांबीचा नदी काठचा रस्ता पीपीपी तयार विकसित करण्यात येणार आहे.