Pune Tendernama
पुणे

Pune : PMC आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर; 'ती' कामे 15 मेपर्यंत पूर्ण करा!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पावसाळ्याच्या पूर्वी शहरातील नाल्यांची सफाई करण्यासाठी कामे सुरू झाली आहेत. महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आंबिल ओढा, नागझरी व माणिक नाल्यांची नुकतीच पाहणी केली. वस्तीमध्ये पाणी घुसणाऱ्या धोकादायक ठिकाणांवरील कामे १५ मे पूर्ण करावीत, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुणे महापालिकेने यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाले सफाई आणि पावसाळी गटारांच्या सफाईची टेंडर प्रक्रिया लवकर पूर्ण करून कामाला सुरुवात केली आहे. यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी नाले सफाई आणि पावसाळी गटारांची स्वच्छता, यासाठी स्वतंत्र टेंडर काढली आहेत.

गेल्या काही वर्षांत नाले सफाईची कामे उशिरा सुरू केल्याने जून महिना उजाडला तरीही कामे सुरच होती. कामे लवकर पूर्ण करण्यासाठी गाळ न काढता वरवरचे गवत, कचरा काढून नाले सफाई झाल्याचे दाखविण्याचा प्रशासनाचा व ठेकेदाराचा खटाटोप सुरू असतो.

आयुक्त भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, मलःनिसारण विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष तांदळे, दिनकर गोजारे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी नाले सफाईची कामे पाहण्यास सुरवात केली.

या परिसराची पाहणी

- वैकुंठ स्मशानभूमी, दांडेकर पूल

- शिवदर्शन, अरण्येश्वर, आंबिल ओढा

- के. के. मार्केट, कात्रज गाव

- कात्रज तलाव, नागझरी व माणिक नाला

पाणी प्रश्‍नाकडे दिले लक्ष

मांगडेवाडी, भिलारेवाडी, येवलेवाडी या भागांत पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. या दौऱ्यात आयुक्तांनी या प्रश्‍नाकडे लक्ष दिले. मांगडेवाडीतील विहिरीचा गाळ काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कात्रज तलावातील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे तेथेही स्वच्छता करण्यास सांगितले आहे. कात्रज तलावात सांडपाणी येत असल्याने परिसरातील सोसायट्यांना डासांचा व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे, त्याबाबत नागरिकांनी तक्रार केल्याने हा तळ्यात येणारे घाण पाणी रोखावे, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

४५ टक्के काम पूर्ण

१५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत नाले सफाईचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत सरासरी ४५ ते ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर कलव्हर्ट व इतर अवघड ठिकाणांची सफाई ७० टक्के झाली आहे. १५ मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

आंबिल ओढा, नागझरी नाला, माणिक नाल्यांच्या परिसरात फिरून नाले सफाईचा आढावा घेतला आहे. महत्त्वाच्या ठिकाणांचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. नाले सफाईचे काम व्यवस्थित झाले असून, मी त्याबाबत समाधानी आहे.

- राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका